अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पॅडमॅन’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरची सुरूवात अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने होते. यात ते म्हणतात की, अमेरिकेकडे ‘सुपरमॅन’, ‘बॅटमॅ’न आणि ‘स्पायडरमॅन’ आहेत. पण भारताकडे ‘पॅडमॅन’ आहे. सिनेमात अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात राधिकाने अक्षयच्या बायकोची भूमिका साकारली आहे.

अरुणाचलम मुरुगनाथम यांनी ग्रामीण भागातील महिलांनी पाळीच्या दिवसांमध्ये वापरायचे सॅनिटरी पॅड वापरावेत, यासाठी चळवळ सुरू केली होती. चित्रपटात अक्षय कुमार अरूणाचलम मरुगनाथम यांची भूमिका साकारत आहे. अक्षय गावातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याचे यंत्र तयार करतो, असे दाखवण्यात आले आहे. या यंत्रामुळे गावातील स्त्रियांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचा त्याचा हेतू असतो. मात्र, अक्षयच्या या कामाला त्याच्या पत्नीसकट सगळ्यांचाच विरोध असतो.

गावातील प्रत्येक व्यक्ती त्याची थट्टा करत असते. मासिक पाळीवेळी महिला कपड्याचा वापर करतात. कपड्याच्या वापरामुळे त्या आजारीही पडतात, त्यामुळे अक्षय त्यांच्यासाठी सॅनीटरी नॅपकिन बनवायला सुरूवात करतो. ट्रेलरमध्ये अक्षय सॅनिटरी नॅपकीन बनवून मुलींना वाटताना दिसतो. पण त्याच्या या कृतीमुळे मुली त्याच्यापासून दूर पळतात. स्वतः अक्षय सॅनिटरी नॅपकीन वापरुन पाहतो. आपला नवरा सॅनिटरी नॅपकीन बनवतो या गोष्टीची लाज वाटून अरुणाचलम यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. चित्रपटात राधिका आपटेने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

एकीकडे पत्नी सोडून जाते तर दुसरीकडे कोणीही मदत करायला तयार नसते. पण याचवेळी त्याच्या मदतीला सोनम कपूर येते. तिच्या मदतीने अक्षय अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामाला लागतो. यादरम्यान संयुक्त राष्ट्राच्या एका कार्यक्रमात अक्षय प्रेरणादायी भाषण देताना दिसतो. संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात चित्रीकरण झालेला हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी हाफ गर्लफेंडचे चित्रीकरण संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात करण्यात आले होते.