मुंबईकरांची जीवन वाहिनी असे रेल्वेला म्हटले जाते. अनेक वेळा पावसामुळे याच जीवन वाहिन्यांचा वेगदेखील मंदावतो. आता या रेल्वेसह मेट्रोलाही जीवन वाहिनी म्हणायला हरकत नाही. मात्र मेट्रोवर कधीच पावसाचा किंवा ट्रॅफिकचा परिणाम होत नाही. अनेक वेळा ट्रॅफिक आणि पावसापासून वाचण्यासाठी प्रवासी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतात. असाच निर्णय बॉलिवूडच्या खिलडी अभिनेता अक्षय कुमारने घेताला आहे. ट्रॅफिकमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा कमी वेळात मेट्रोने पोहोचण्याचा निर्णय अक्षयने घेतला.
दरम्यान अक्षय कुमारने या मेट्रो प्रवासाचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अक्षयला सामान्य माणसांप्रमाणे मेट्रोने प्रवास करताना पाहून चाहत्यांना आनंद झाला असून त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ शेअर करत ‘आज मी मुंबई मेट्रोने प्रवास करत आहे. घाटकोपर ते वर्सोवादरम्यान असलेल्या ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी आणि बॉस प्रमाणे प्रवास करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे’ असे त्याने कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
‘मी आता मेट्रोमध्ये आहे. माझ्या चित्रपटाचे चित्रीकरण घाटकोपरमध्ये सुरु आहे आणि तेथून मला काही कामानिमित्त वर्सोवा पोहोचायचे होते. घाटकोपरपासून वर्सोवा पोहोचण्यासाठी २ तासांचा कालावधी लागणार असल्याचे गुगल मॅप सांगत होते. गूड न्यूज चित्रपटाचा दिग्दर्शक राजने मला वेळ वाचवण्यासाठी मेट्रोने प्रवास करण्याचा सल्ला दिला. परंतु मी गर्दीला घाबरुन नकार देत होते. पण मग मी सामान्य व्यक्तींप्रमाणे प्रवास करण्याचा निर्णय घेतला. एक दोन सुरक्षा रक्षक घेतले आणि मेट्रोच्या एका कोपऱ्यात उभे राहून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. काही लोक मला ओळखत असतील’ असे अक्षय म्हणाला.
‘पण मेट्रोचा प्रवास खरच खूप सोपा आणि कमी वेळाचा आहे. मी २ तासांऐवजी २० मिनिटांमध्ये घाटकोपरवरुन वर्सोव्याला पोहोचलो. मी या प्रवासाचा आनंद घेत आहे. मला असं वाटत ही एकच वाहतूक सुविधा आहे ज्यावर पावसाचा आणि ट्रॅफिकचा परिणाम होत नाही’ असे अक्षय कुमारने म्हटले आहे.