गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘हाऊसफुल ४’ चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांची चित्रपटाबाबती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र ट्रेलर प्रदर्शनानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

‘हाऊसफूल ४’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेले संगीत चोरल्याचा आरोप अनेकांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर केला आहे. ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेले पार्श्व संगीत हे दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या ‘कैदी १५०’ या चित्रपटातील संगीताप्रमाणे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या चित्रपटातील संगीत हे दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे.

‘कैदी १५०’ चित्रपटातील दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांचे संगीत ‘हाऊसफुल ४’मध्ये त्यांना श्रेय न देता वापरल्याने हा वाद सुरु झाला असल्याचे म्हटले जात आहे. परंतु ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही.

‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला ‘हाऊसफुल ४’ हा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपटातील सर्व कलाकारांचा पुनर्जन्म झाला असून त्यांना ६०० वर्षांपूर्वीचा काळ आठवत असल्याचे दिसत आहे. तसेच चित्रपटात सगळ्याच कलाकारांचा डबल रोल असणार आहे. अक्षय कुमारसोबतच रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची फौज यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीने केले आहे. दिग्दर्शक साजिद खानवर #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर फरहादकडे दिग्दर्शन सोपवले गेले. दिवाळीच्या मुहूर्तावर, २६ ऑक्टोबर रोजी हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.