बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार लागोपाठ हिट चित्रपट देत आहे. त्याने केलेल्या आताच्या चित्रपटांवर नजर टाकली तर आपल्याला सद्य परिस्थितीवर आणि देशभक्तीपर चित्रपटात त्याने काम केलेले पाहायला मिळेल. पण, आता तो काही वेगळ्याच विषयासह आणि शीर्षकासह सर्व चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात तो झळकणार आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच सेटवरील अनोखे असे छायाचित्र अभिनेता अक्षय कुमारने पोस्ट केले आहे. या चित्रपटात त्याच्यासह ‘दम लगाके हयशा’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर झळकणार आहे. या दोन्ही कलाकारांनी मथुरा येथे सदर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे.

 

अक्षय कुमारने चित्रपटाच्या सेटवरील एक छायाचित्र पोस्ट केले आहे. या छायाचित्रात अक्षय, भूमी आणि त्यांच्या मागे टॉयलेट पाहावयास मिळते. या छायाचित्रासह अक्षयने लिहले की, भूमी आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’च्या सेटवर आहोत. चित्रीकरणाचा पहिलाच दिवस असून तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे.

याव्यतिरीक्त अक्षयने आणखी एक फोटो ट्विट केला आहे. सेट जवळूनन जाणा-या एका वाटसरूने अक्षयला खास भेट दिली आहे. तुम्हाला काय वाटतं काय असेल ही खास भेट? तर ही भेट आहे ‘भगवदगीता’. त्याने चाहत्यांसह आपला हा आनंद व्यक्त केला आहे. अक्षयने ट्विट केले की, याहून दिवसाची चांगली सुरुवात होऊ शकत नाही. मथुरात आलो आणि पहिल्याच दिवशी येथील एका वाटसरूने मौल्यवान अशी ‘भगवदगीता’ भेट म्हणून दिली.

अक्षयने त्याच्या आयुष्यातील छोटे छोटे क्षण चाहत्यांसह शेअर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी ‘जॉली एलएलबी २’च्या वेळी तो लखनौ येथे गेला होता. तेव्हा त्याने चाहते, शेफसोबतचे आणि तेथील काही सुंदर ठिकाणांचे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबासह चांगला वेळ व्यथित केल्यानंतर अक्षय भारतात परतला होता. प्रसारमाध्यमांपासून दूर अशा ठिकाणी आपली पत्नी ट्विंकल आणि दोन मुलांसह आनंदी क्षण घालवण्याचे त्याने ठरविले होते. अक्षय आणि ट्विंकलने पोस्ट केलेल्या छायाचित्रांमुळे त्याच्या चाहत्यांना याची झलक पाहावयास मिळाली.

 

Story img Loader