सातत्यपूर्ण कामगिरीतून कार्टून विश्वात आपली मक्तेदारी निर्माण करणाऱ्या ‘द वॉल्ट डिस्ने’च्या अफाट लोकप्रियता आणि आर्थिक यशात ‘अल्लाउदीन’ या व्यक्तिरेखेचा सिंहाचा वाटा आहे. ‘अरेबियन नाइट्स’ या कथासंग्रहातील ‘अल्लाउदीन आणि जादूचा दिवा’ या लोकप्रिय कथेतून १९९२ साली ‘अल्लाउदीन’ या कार्टूनपटासाठी या व्यक्तिरेखेची निर्मिती करण्यात आली होती. आज या घटनेला तब्बल २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि हे औचित्य साधून डिस्नेने अल्लाउदीनचा २५वा वाढदिवस त्याच्या लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत एका डिजिटल कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला.

फेसबुक, ट्विटर आणि यूटय़ूबवरून लाइव्ह करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नाव ‘अल्लाउदीन ब्रॉडवे’ असे ठेवण्यात आले होते. यात डिस्नेच्या काही गाजलेल्या पात्रांना आवाज देणारे कलाकार उपस्थित होते. आणि त्यांनी त्या पात्रांच्याच आवाजात चाहत्यांच्या प्रश्नांची गमतीदार उत्तरे दिली.सलग दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात अचानक एका चाहत्याने जादूच्या दिव्यातील त्या जिनीचा हिरव्या रंगातील एक फोटो पोस्ट केला. त्याचबरोबर त्या व्यक्तिरेखेला आवाज दिलेल्या अभिनेता रॉबिन विल्यम्स यांच्याही काही जुन्या आठवणी उचंबळून बाहेर आल्या. आणि त्यांनी जिनीच्याच आवाजात आपले काही जुने अनुभव सांगायला सुरुवात केली. त्यांच्या मते अल्लाउदीनची जादूई कथा त्या निळ्या राक्षसाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. किंबहुना, जिनीमुळेच अल्लाउदीनला विशेष महत्त्व प्राप्त होते.

१९९२ साली जेव्हा पहिल्यांदा जिनी हे पात्र लेखक जॉन मस्कर यांच्यामार्फत लिहिले गेले तेव्हा त्याचा रंग हिरवा होता. तसेच चित्रपटाचे पोस्टरही हिरव्या रंगाच्या जिनीने भरले होते, परंतु नंतर दिग्दर्शक रॉन क्लेमेंट्स यांच्या सल्ल्यानुसार त्याचा रंग निळा करण्यात आला. कारण या चित्रपटाच्या निर्मितीमागे लहान मुलांचे मनोरंजन हा मुख्य उद्देश होता. आणि निळ्या रंगातील तो राक्षस हिरव्या रंगाच्या तुलनेने अधिक गमतीदार दिसत असल्याने पुढे त्याला कायमचा निळा रंग देण्यात आला. अल्लाउदीनच्या चाहत्यांनीही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची रंगत वाढवली.