बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांची बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरलेली ‘तांडव’ ही सीरिज अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र, ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान झाल्याचं म्हणत सोशल मीडियावर #BoycottTandav हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. त्यासोबतच #BoycottBollywood हादेखील हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

या सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये भगवान शंकराच्या वेशात अभिनेता जीशान अय्यूब विद्यार्थ्यांना शिकवतांना दिसत आहे. यामध्येच श्रीरामांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू देव-देवतांची हेटाळणी केली जात असल्याचं म्हटलं जात आहे.

“नारायण,नारायण, प्रभू काहीतरी करा. रामजींचे फॉलोअर्स सोशल मीडियावर वाढत आहेत. त्यामुळे मला वाटतंय आपण देखील एखादी योजना आखली पाहिजे”, असं एक व्यक्ती जीशान अय्यूबला म्हणते. त्यावर, “काय करु मी? फोटो बदलू का?” असा संवाद या दोघांमध्ये दाखवण्यात आला आहे. या एपिसोडनंतर ‘तांडव’ सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. इतकंच नाही तर, या सीरिजसोबत आता सोशल मीडियावर #BoycottBollywood हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला आहे. आतापर्यंत कलाविश्वात ज्या घडामोडी घडल्या आहेत. त्यावरुन #BoycottBollywood हा हॅशटॅग ट्रेण्ड होत असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.

Story img Loader