पाकिस्तानी गायिका मीशा शफी सध्या चांगलीच अडचणीत आली असून तिला लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेलं अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी मीशाने अभिनेता आणि संगीतकार अली जफरविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. मीशाच्या या आरोपानंतर अलीवर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली होती. इतकंच नाही तर अन्य काही महिलांनीही मीशाची साथ देत अलीवर आरोप केले होते. मात्र आता अलीने याप्रकरणी ठोस निर्णय घेतला असून त्याने मीशावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

अलीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं मीशाने सोशल मिडीयामध्ये सांगितलं  होतं. तसंच #Me Too  हा हॅशटॅग वापरत तिच्यावर झालेल्या अन्यायाला तिने वाचा फोडली होती. मात्र मीशाने केलेले आरोप अलीने फेटाळले असून त्याने तिच्यावर १०० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.अलीने हा दावा ठोकण्यापूर्वी मीशाला कायदेशीर नोटीसही पाठविली होती.

‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून मीशाने माझी जाहीर माफी मागावी अन्यथा माझी प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी’, असे यापूर्वी अलीने पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र तरीदेखील मीशाने या नोटीसला उत्तर न दिल्यामुळे अखेर अलीने मीशावर १०० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. त्यामुळे आता मीशा कोणते पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे अलीची मोठ्या प्रमाणावर मानहानी झाली असून त्याच्या करिअरवरही त्याचा कमी-अधिक प्रमाणात परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी अली जफरने ‘तेरे बिन लादेन’, ‘लव का दी एन्ड’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘चष्मेबद्दुर’, ‘किल दिल’ या चित्रपटांत भूमिका साकारली असून तो ‘डियर जिंदगी’ या चित्रपटातही झळकला आहे.