‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आलिया भट्ट आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘राजी’, ‘गली बॉय’, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांमध्ये दर्जेदार अभिनय करुन तिने कलाविश्वात स्वत:च भक्कम स्थान निर्माण केलं. लोकप्रियता आणि उत्तम अभिनय यामुळे बऱ्याच चित्रपटांसाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती आलियाला असते. कमी वयामध्ये यश आणि वैभव पाहणारी आलिया चित्रपटांसाठी मानधनही तितकंच तगडं घेते. त्यामुळे तिने कमी वयामध्ये चांगलीच संपत्ती कमावली आहे. परंतु अफाट संपत्ती कमाविणारी आलिया तिची आर्थिक गुंतवणूक कशी करते हा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये आलियाने ती आर्थिक गुंतवणूक कशात करते हे सांगितलं.
‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आलियाने ती पैसे कुठे आणि कसे खर्च करते. तसंच तिला कोणत्या गोष्टींमध्ये आर्थिक गुंतवणूक करायला आवडते हे सांगितलं. बहुतांश सेलिब्रिटी त्यांचा पैसा विदेशी बॅंकांमध्ये जमा करतात. मात्र आलिया तिचे पैसे फिक्स्ड डिपॉझिट किंवा बॉण्डमध्ये गुंतवते. तसंच तिला म्युच्युअल फंडमध्येदेखील पैसे सेव्ह करण्याची सवय आहे.
“मला विनाकारण खर्च करायला आवडत नाही. लहान असताना सुद्धा मी कधीही कोणती महागडी वस्तू विकत घेतली नाही. जेव्हा मी आई आणि बहिणीसोबत लंडनला फिरायला जायचे तेव्हा आम्हाला खर्च करण्यासाठी मर्यादित पैसे दिले जायचे”, असं आलिया म्हणाली.
वाचा : तूप,बटर खाऊनही भूमी राहते फीट; असा आहे भूमीचा फिटनेस फंडा
पुढे ती म्हणते, “मला आर्थिक गुंतवणुकीबाबत फारसं काही माहित नाही. परंतु गेल्या वर्षापासून मी यात इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली आहे. मी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आणि बॉण्डमध्ये गुंतवणूक करते. तसंच म्युच्युअल फंडही चांगले असतात असं मला समजलं आहे. त्यामुळे त्यातही काही गुंतवणूक करते. जुहूमध्ये मी पहिल्यांदा स्वत:ची प्रॉपर्टी खरेदी केली”.
वाचा : कृष्णा अभिषेकला सोडायचाय ‘द कपिल शर्मा’ शो; कारण…
दरम्यान,दर्जेदार अभिनयामुळे आजवर आलियाचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत. सहाजिकच आहे त्यामुळे तिच्या मानधनाचा आकडाही तितकाच जास्त असणार. आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर स्क्रीन शेअर करणार आहे.