२८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘चालबाज’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला. रजनीकांत, सनी देओल आणि श्रीदेवी अशी तगडी स्टारकास्ट, श्रीदेवीने साकारलेल्या दुहेरी भूमिका, अनुपम खेरचा खलनायक अवतार या सर्व गोष्टींमुळे हा चित्रपट लक्षवेधी ठरला. हाच चित्रपट आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करणार आहे. कारण डेविड धवन ‘चालबाज’चा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून डेविड रिमेकसाठी चित्रपटाच्या संहितेवर काम करत आहेत. यासोबतच श्रीदेवीच्या दुहेरी भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. एक चलाख आणि चंचल तर दुसरी सुशील आणि शांत अशा दोन भूमिका साकारण्यासाठी अखेर त्यांनी आलिया भट्टची निवड केल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात त्यांनी तिच्याशी चर्चासुद्धा केली आहे.
वाचा : ‘पद्मावती’ वादावर पंतप्रधान मोदी आणि स्मृती इराणी गप्प का?- शत्रुघ्न सिन्हा
गोव्यात ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘नवभारत टाइम्स’ या वेबसाइटशी संवाद साधताना आलिया म्हणालेली की, ‘डेविड यांच्याजवळ मी ‘जुडवा ३’मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण ‘जुडवा ३’पेक्षाही चांगला चित्रपट तुला देणार असल्याचं सांगत त्यांनी नकार दिला.’
वाचा : ‘आशिकी गर्ल’सोबत हॉरर कॉमेडीत झळकणार राजकुमार
विशेष म्हणजे एका मुलाखतीत श्रीदेवीने स्वत: ‘चालबाज’मधील तिच्या भूमिकेसाठी आलियाचं नाव सुचवलं होतं. आलिया त्या भूमिका अगदी चोख साकारू शकते, असं ती म्हणाली होती. ‘चालबाज’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आलियावर शिक्कामोर्तब झाल्यास, दुहेरी भूमिका साकारण्याचा हा तिचा पहिलाच प्रयत्न असेल.