दिग्दर्शिका, निर्मात्या विनता नंदा आणि ‘तारा’ मालिकेतील अभिनेत्री नवनीत निशान यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर अभिनेते आलोक नाथ यांची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला असून प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावं अशी विनंती त्यांचे वकील अशोक सरावगी यांनी केली आहे.

‘आलोक नाथ यांची प्रकृती सुधारल्यानंतर एक- दोन दिवसांत ते स्वत: प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलतील. तोपर्यंत त्यांच्या वतीन मी बोलणार. त्यांना मानसिक धक्का बसला आहे,’ असं वकील सरावगी म्हणाले. विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. ‘मी हे आरोप नाकारत नाही आणि स्वीकारतही नाही. ती घटना (बलात्कार) घडली असावी, पण कोणा दुसऱ्या व्यक्तीने तो केला असावा. मी या विषयावर अधिक बोलणार नाही कारण तितकाच तो ताणला जाईल,’ असं आलोक नाथ एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. तिने केलेल्या आरोपांवर मी काही प्रतिक्रिया देणं निरर्थक आहे, कारण सध्याच्या घडीला महिला जे बोलते तेच सत्य मानलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीत मी काहीही बोलणं चुकीचं ठरेल, असंही ते म्हणाले.

या संपूर्ण प्रकरणाची ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने (CINTAA) दखल घेतली असून आलोक नाथ यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.