या दिवाळीत एकीकडे आमिर खानचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ तर दुसरीकडे अजय देवगणचा ‘गोलमान अगेन’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यासोबतच एक कपूरसुद्धा तुमच्या भेटीला येणार आहे. शाहिद कपूरच्या आगामी ‘रोशनी’ या चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा हिट चित्रपट ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’चा दिग्दर्शक श्री नारायण सिंग शाहिदच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत तर विपूल रावल यांनी पटकथा लिहिली आहे.

या चित्रपटाची कथा एका सामान्य माणसाची आहे जो वीज वितरण कंपन्यांच्या अनागोंदी कारभाराविरोधात लढत असतो. यासंदर्भात दिग्दर्शक श्री नारायण सिंग म्हणाले की, ‘दिवाळी हा प्रकाशाचा सण असल्याने टीझर प्रदर्शित करण्यासाठी हीच योग्य वेळ असू शकते असं मला वाटतं. एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून उचलणार आहोत.’

वाचा : ‘फास्टर फेणे’ हा माझ्या हृदयाजवळचा चित्रपट- रितेश देशमुख 

‘रोशनी’ या चित्रपटात शाहिद एका वकीलाची भूमिका साकारणार आहे, जो वीज वितरण कंपनांच्या अनागोंदी कारभाराविरोधात लढा देत असतो. शाहिदसोबत कतरिना कैफही यामध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. पुढच्या वर्षी जानेवारीपासून शूटिंगला सुरूवात होणार आहे.

वाचा : रोहित शेट्टीला का वाटतेय आमिरची भिती? 

त्यापूर्वी शाहिदचा ‘पद्मावती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात तो राजा रावल रतन सिंहची भूमिका साकारणार आहे. यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचीही मुख्य भूमिका आहे.