सध्याच्या तरुणाईमध्ये रॅप हा प्रकार विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक तरुण या प्रकाराकडे करिअर म्हणून पाहताना दिसतात. सध्याच्या काळात अनेक रॅपर हे त्यांच्या रॅप करण्याच्या पद्धतीमुळे आणि खासकरुन त्यांच्या स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखले जात आहेत. यात अनेक रॅपरने त्यांच्या अंगावर टॅटू गोंदवून किंवा पिअरसिंग करुन त्यांची एक वेगळी स्टाइल तयार केली आहे. यामध्ये मात्र, सध्या एक २६ वर्षीय रॅपर चांगलाच चर्चेत आला आहे. या रॅपरने स्टाइलच्या नावाखाली चक्क कपाळावर हिरा लावून घेतल्याचं समोर आलं आहे.
लिल उजी वर्ट असं या रॅपरचं नाव असून त्याने चक्क कपाळावर हिरा बसवून घेतला आहे. काही तरी वेगळं करण्याच्या नादात त्याने कपाळावर हा हिरा बसवून घेतला आहे. विशेष म्हणजे हा हिरा प्रचंड महाग असून त्याची किंमत २४ दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास १७५ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. लिल उजी वर्टने त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात त्याने हा हिरा बसवल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.
View this post on Instagram
लिलने इन्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने सौंदर्य हे किती वेदनादायी असतं असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोत त्याच्या कपाळावर गुलाबी रंगाचा हिरा असल्याचं दिसून येतं. त्याने हा हिरा एलियट एलियनेट या ज्वेलर्सकडून खरेदी केला आहे. ही कंपनी अत्यंत दुर्मिळ आणि महागडे हिरे विकण्यासाठी प्रसिद्ध आहे.
दरम्यान,लिलचं खरं नाव सायमर बायसिल वुड्स असं असून तो कायम त्याच्या टॅटू आणि चित्रविचित्र हेअर स्टाइलमुळे चर्चेत असतो. सध्या त्याच्या या नव्या स्टाइलची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. अनेकांनी त्याला ट्रोलदेखील केलं आहे. वुड्सच्या कपाळावरील हा हिरा अवेंजर्स मालिकेतील अल्ट्रॉन आणि एंडगेम या दोन चित्रपटातील व्हिजनप्रमाणे असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.