ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरविषयी जेव्हाही चर्चा होते तेव्हा त्यांचे सहकलाकार अमिताभ बच्चन यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. पडद्यावरील आणि पडद्यामागील यांच्या मैत्रीची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना, चाहत्यांना भावली.

‘दीवार’, ‘नमक हलाल’, ‘शान’, ‘त्रिशूल’, ‘सुहाग’, ‘दो और दो पांच’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र भूमिका साकारली. त्याकाळी शशी आणि अमिताभ यांच्या जोडीला इतकी प्रसिद्धी मिळाली की दिग्दर्शक त्यांना घेऊन चित्रपट निर्मिती करण्यास उत्सुक असायचे.

वाचा : BLOG : अभिनयातला ‘चंद्र’ हरपला

चित्रपटसृष्टीत मिळालेल्या यशाचे श्रेय बिग बी पूर्णपणे शशी यांना देतात. बऱ्याच मुलाखतींमध्ये बिग बींनी यासंदर्भातील किस्से सांगितले. आज मी जे काही यश संपादन केले आहे, त्यामागे शशी कपूर यांचे खूप योगदान आहे, असे ते म्हणतात. ‘शशी कपूर यांनी मला नेहमीच साथ दिली. जेव्हा मी नोकरीच्या शोधात होतो, तेव्हा त्यांच्या चित्रपटांच्या सेटवर अनेकदा भेट द्यायचो. त्यावेळी ते नावाजलेले अभिनेते होते. काही दिग्दर्शकांशी त्यांनी माझी ओळखही करून दिलेली,’ असे बिग बींनी एका मुलाखतीत सांगितले.

वाचा : ‘हमको तुमपे प्यार आया..’, ही आहेत शशी कपूर यांची गाजलेली गाणी

शशी कपूर यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर ते फारच खचले. ते एकटे राहणेच पसंत करायचे पण अमिताभ यांच्या संपर्कात ते कायम होते असे बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते. शशी कपूर नसते तर मी बॉलिवूडपासून केव्हाच दूर गेलो असतो, असेही ते म्हणतात.