अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण चित्रपटसृष्टी स्तब्ध झाली आहे. ३४ वर्षांच्या त्या हसमुख चेहऱ्यामागे काय दु:ख दडलं असेल याची कल्पनासुद्धा कोणी करू शकत नाही. त्या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न घोंघावतोय की… सुशांतने आत्महत्या का केली? बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा सुशांतसाठी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये हाच प्रश्न विचारला आहे.
या ब्लॉगची सुरुवातच बिग बींनी प्रश्नाने केली आहे. ‘का.. का.. का सुशांत सिंह राजपूत? तू दमदार कलाकार होतास. काहीच न बोलता, काहीच न मागता कायमचा निघून गेलास’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सुशांतच्या कामाची स्तुती करत त्यांनी पुढे लिहिलं, ‘जितकं दमदार त्याचं काम होतं, त्याहून अधिक तल्लख त्याची बुद्धी होती. खोल अर्थ दडलेल्या कविता त्याने अनेकदा पोस्ट केल्या आहेत. त्या कवितांचा अर्थ समजून काहीजण आश्चर्यचकीत झाले तर काही जण त्या शब्दांची ताकद समजण्यास असमर्थ राहिले.’
बिग बींनी या ब्लॉगमध्ये सुशांतच्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. त्यांनी लिहिलं, ‘मी धोनी या चित्रपटातील सुशांतचं पूर्ण काम पाहिलं. चित्रपटातील त्याच्या प्रत्येक संवादामध्ये असं काही दडलं होतं, जे शेवटपर्यंत अव्यक्तच राहिलं. मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा इंटरनॅशनल टुर्नामेंटमधला धोनीचा तो षटकार हुबेहूब कसा मारला याबद्दल कुतूहलतेने विचारलं. त्यावर सुशांतने उत्तर दिलं की त्याने धोनीचा तो व्हिडीओ १०० वेळा पाहिला होता. हीच त्याची कामाप्रती असलेली गंभीरता होती.’
आणखी वाचा : सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी नेमकं काय घडलं?
‘आमच्या काळातील प्रतिभावान कोरिओग्राफर शामक दावर यांच्या डान्सर्स ग्रुपमध्ये तो चौथ्या रांगेतला डान्सर असायचा. त्याची सुरुवात शून्यापासून झाली. तिथून ते आज तो ज्या ठिकाणी पोहोचला होता, ती कहाणीच सर्वकाही सांगून जाते. एवढं सारं मिळवल्यावर आत्महत्या करण्याचा विचार मनात येतो कुठून हे एक गूढच आहे.’, असं लिहित त्यांनी ब्लॉगचा शेवट केला.