‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोचा नववा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिझनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. स्पर्धकाला देण्यात येणाऱ्या पर्यायांमध्ये प्रामुख्याने हे बदल करण्यात आले आहेत. या नवीन सिझनमध्ये ‘फोन-ए-फ्रेंड’ची जागा ‘व्हिडिओ-ए-फ्रेंड’ने घेतली असून जिंकलेली रक्कम थेट स्पर्धकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. जाणून घेऊयात नेमके काय बदल करण्यात आले आहेत…

व्हिडिओ-ए-फ्रेंड
यंदा ‘कौन बनेगा करोडपती’ प्रेक्षक आणि स्पर्धकांसाठी काही सरप्राईजेस घेऊन येतोय. त्यामध्ये ‘व्हिडिओ-ए-फ्रेंड’ हा नवीन बदल आहे. यापूर्वीच्या सिझनमध्ये स्पर्धक ‘फोन-ए-फ्रेंड’ हा पर्याय वापरून मित्रांना किंवा नातेवाईकांना फोन करुन उत्तर विचारायचे. आता फोनऐवजी व्हिडिओ कॉल करुन स्पर्धकांना संवाद साधता येणार आहे. मुख्य म्हणजे या पर्यायामुळे शोचे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

लाईफलाइन जोडीदार
२८ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या सिझनमध्ये एक नवीन लाईफलाइनसुद्धा असणार आहे. ‘लाईफलाइन जोडीदार’च्या पर्यायामुळे स्पर्धक त्यांच्यासोबत हॉट सीटवर बसण्यासाठी एक पार्टनरही आणू शकतील.

जॅकपॉट प्रश्न
जॅकपॉट प्रश्न हा एक महत्त्वपूर्ण बदल यामध्ये करण्यात आलाय. हा जॅकपॉट प्रश्न निवडल्यास इतर सर्व लाईफलाइन बाद होतील. मात्र प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यास स्पर्धकाला एकहाती सात कोटी रक्कम जिंकता येईल. यापूर्वी जिंकलेली रक्कम धनादेश स्वरुपात दिली जायची. आता डिजीटल पेमेंटद्वारे म्हणजेच स्पर्धकाच्या बँक खात्यात थेट ही रक्कम जमा होणार आहे.

गतीमान
एका तासात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवून केबीसीचा हा नववा सिझन गतीमान करण्यात आलाय. त्याचप्रमाणे उत्तरासाठी स्पर्धकांना दिला जाणारा वेळ कमी करण्यात आलाय. केवळ सहा आठवड्यांसाठी हा शो असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. केबीसीचे ३० एपिसोड या सिझनमध्ये प्रसारित होतील.

विशेष एपिसोड
या विशेष एपिसोडमध्ये आपल्याला हॉट सीटवर रिअल लाइफ हिरो पाहायला मिळणार आहेत. ३० एपिसोड्सपैकी काही हे विशेष एपिसोड असतील ज्यामध्ये बिग बी रिअल लाइफ हिरोंना शोमध्ये आणणार आहेत.
यंदाच्या सिझनसाठी रेकॉर्डब्रेक रेजिस्ट्रेशन झालंय. सात दिवसांमध्येच १ कोटी ९८ लाख रेजिस्ट्रेशन झाले होते. २८ ऑगस्टपासून सोनी वाहिनीवर रात्री नऊ वाजता हा शो प्रसारित होणार आहे.