शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि महानायक अमिताभ बच्चन यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. बाळासाहेबांनी बच्चन यांना नेहमीच आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्थान दिलं, वेळप्रसंगी बाळासाहेब बच्चन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा ‘ठाकरे’चं टिझर लाँचिगवेळी अमिताभ यांनी बाळासाहेबांशी निगडीत अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘कुली’च्या चित्रिकरणादरम्यान झालेला अपघात, जया बच्चन यांचं स्वागत, कुटुंबावर झालेले आरोप, ते अगदी बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनेक आठवणी जिवंत करण्यात अमिताभ बच्चन हरवून गेले.

वाचा : ‘बाळासाहेब ठाकरेच मला मराठी बोलण्याची प्रेरणा देतील’

‘कुली’नंतर बच्चन यांनी बाळासाहेबांच्या शेवटच्या काळतली आठवणही सांगितली. ‘बाळासाहेब शेवटच्या क्षणी जेव्हा अंथरुणाला खिळले होते, तेव्हा त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी मला उद्धव ठाकरे यांनी दिली. एका तुफान वादळाला आणि धडाडीच्या नेत्याला अशा अवस्थेत पाहून माझ्या काळजाचं पाणी झालं. त्याक्षणी माझं लक्ष दुसरीकडे गेलं. त्यावेळी मी जे काही पाहिलं ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. बाळासाहेब जिथे झोपले होते, तिथे डाव्या बाजूला एक छायाचित्र होतं आणि ते छायाचित्र माझं होतं. बाळासाहेबाचं माझ्यावर प्रेम आहे हे मला ठाऊक होतं पण माझ्यावर त्यांचा स्नेह सर्वाधिक होता हे मला त्या दिवशी प्रकर्षानं जाणवलं. ‘

Video : त्यावेळी शिवसेनेची रूग्णवाहिका होती, म्हणून मी वाचलो-अमिताभ बच्चन

बाळासाहेबांविषयी बोलताना अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाले, माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आलेत. त्यावेळी बाळासाहेब नेहमी माझ्यासोबत असायचे. अनेकदा माझ्यावर काही आरोपही झाले की बाळासाहेब मला फोन करुन आवर्जून जाब विचारायचे. माझं लग्न झालं होतं तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. पण, ही केवळ औपचारिक भेट नव्हती. मी जेव्हा ‘मातोश्री’वर गेलो. त्यावेळी ‘माँ’ने सूनेसारखं जयाचं स्वागत केलं आणि अगदी त्या दिवसापासून मी बाळासाहेबांना माझ्या वडिलांप्रमाणे मानू लागलो असंही बच्चन म्हणाले.

[jwplayer PVoN8M4M]