बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी बिग बींनी आपल्या वडिलांची एक कविता वाचून दाखवली आहे. करोना विषाणूची लागण झालेले बिग बी सध्या नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र रुग्णालयात असताना त्यांना आपल्या वडिलांची आठवण येत आहे.

अमिताभ यांचे वडिल श्री. हरिवंशराय बच्चन एक उत्तम कवी होते. रुग्णालयात उपचार घेत असताना बिग बींना एकटं पडल्यासारखं वाटत आहे. या एकटेपणात त्यांना आपल्या वडिलांची खूप आठवण येत आहे. त्यामुळे वडिलांच्या आठवणीत हरवलेल्या बिग बींनी त्यांचीच एक कविता आपल्या चाहत्यांना वाचून दाखवली आहे. कवी संमेलनांमध्ये ही कविता हरिवंशराय बच्चन वाचून दाखवायचे. अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ११ जुलै रोजी अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच पाठोपाठ त्यांच्या कुटुंबीयांची देखील करोना चाचणी करण्यात आली. यात अभिषेक करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यालाही नानावटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे या दोघांनाही लवकरच बरं वाटावं यासाठी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात अमिताभ आणि अभिषेकसाठी पूजा करण्यात आली. मंत्रोच्चाराच्या घोषात जलाभिषेक करण्यात आला असून महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं गेलं. दरम्यान गेल्या १५ दिवसांच्या उपचारानंतर बिग बींच्या तब्येतीत सुधार होत आहे. परिणामी लवकरच त्यांना रुग्णालयात घरी सोडले जाईल अशी शक्यता आहे.