बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते व कलाकार आतुर असतात. अशातच जर त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र मिळाले तर कोणाच्याही आनंदाला पारावार उरणार नाही. असंच काहीसं सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत घडलंय. बिग बींनी स्वहस्ताक्षरातील पत्र सोनालीला पाठवले आहे. त्यामुळे तिला झालेला आनंद गगनात मावेनासा आहे.
सोनालीने पत्राचा फोटो काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ‘अजून काय हवंय आयुष्यात.. महानायकाच्या हस्ताक्षरातील पत्र..’, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय. या पत्राद्वारे बिग बींनी सोनालीचे आभार मानले आहेत. देशभरातील नामांकित कलाकारांना एकत्र घेऊन करण्यात आलेल्या ‘फॅमिली’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केल्याबद्दल बिग बींनी तिचे आभार मानले आहेत. करोना विषाणूविरुद्धच्या या लढय़ात सगळ्यांनी घरातच राहणे महत्त्वाचे आहे हा संदेश देणारी ही मजेशीर फिल्म या कलाकारांनी आपापल्या घरातच राहून चित्रित केली आहे.
अमिताभ बच्चन, रजनीकांत, माम्मुट्टी, प्रोसेनजीत, दिलजीत दोसैन, रणबीर कपूर, अलिया भट्ट, प्रियांका चोप्रा यांच्याबरोबरीने मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही या शॉर्टफिल्मचा महत्त्वाचा भाग आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी आपल्याला फोन करून या शॉर्टफिल्ममध्ये सहभागी होण्याविषयी विचारणा केली होती, असे सोनालीने सांगितले. करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी लोकांनी घरात राहणे महत्त्वाचे असून त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी देशभरातील कलाकारांना एकत्र घेऊन अशा पद्धतीची शॉर्टफिल्म आम्ही करत आहोत. यात मराठी चित्रपटसृष्टीची प्रतिनिधी म्हणून तू सहभागी होशील का? अशी विचारणा अमिताभ यांनी के ल्याची आठवण सोनालीने सांगितली.
अमिताभ यांचा फोन आला तेव्हा अंगावर काटा आला होता. ते असे काही विचारतील, याची कल्पनाच नव्हती. आणि के वळ अमिताभच नव्हे तर रजनीकांत, रणबीर, प्रियांका, अलिया अशा मोठमोठय़ा कलाकारांचा सहभाग असलेल्या या शॉर्टफिल्मचा भाग होता आल्याबद्दल खूप आनंद वाटल्याचेही सोनालीने सांगितले.