बॉलिवूडचा महानायक अर्थात अमिताभ बच्चन ट्विटरवर बऱ्यापैकी सक्रीय असतात. चालू घडामोडी, एखादा किस्सा, किंवा त्यांना आवडलेली गोष्ट ते ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तसे तर त्यांचे चाहते लाखोंच्या संख्येने आहेत. पण असा क्वचित एखादा चाहता असेल ज्याचा उल्लेख बिग बी स्वत: करत असतील. त्यांच्या अशाच एका चाहतीचा फोटो बिग बींनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर दर रविवारी गर्दी करतात. जर ते मुंबईत असले तर चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी बंगल्याबाहेर नक्की येतात. चाहत्यांकडून मिळणाऱ्या या प्रेमाबद्दल बिग बी त्यांचे आभार मानतात. गेल्या रविवारीसुद्धा नेहमीप्रमाणे त्यांच्या बंगल्याबाहेर हेच चित्र दिसले. मोठ्या संख्येने गेटबाहेर चाहते बिग बींची वाट पाहत उभे होते. या गर्दीतून एक चिमुकली गेटच्या आत आली आणि बिग बींच्या समोर जाऊन उभी राहिली. तिने त्यांच्याशी हस्तांदोलनही केले. बिग बींनी तिला जवळ बोलावून तिचे लाडकौतुकदेखील केले.

या चिमुकल्या चाहतीचे फोटो त्यांनी स्वत: ट्विटरवर शेअर केले आहेत. ‘ही चिमुकली केवळ माझी भेट घेण्यासाठी, माझ्याशी हात मिळवण्यासाठी या गर्दीतून आत आली. ती खूप गोड आहे,’ असे कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिले. चाहत्यांच्या गर्दीतून मार्ग काढत केवळ बिग बींच्या भेटीला आलेल्या या चिमुकलीचे प्रेम आणि धाडस पाहून बिग बीसुद्धा भारावले.