टीव्हीवर चॅनल ट्यून करताना तुम्हाला एकच चित्रपट अनेकदा लागल्याचं पाहायला मिळाला असेल. असाच एक चित्रपट म्हणजे ‘सूर्यवंशम’. १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने टीव्हीवर टेलिकास्ट होण्याचा जणू रेकॉर्डच केला आहे. यातली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूपच चांगल्या प्रकारे लक्षात असेल. हिरा ठाकूर, राधा, गौरी आणि मेजर रंजीत यांसारख्या भूमिकांचे संवाद तर तोंडपाठ झाले असतील. याच दिवशी म्हणजे २१ मे रोजी १९९९ मध्ये अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि आज त्याला १९ वर्ष पूर्ण झाले आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटावरून बरेच मीम्स आणि विनोदसुद्धा व्हायरल होतात. मात्र, टीव्हीवर हा चित्रपट का सतत लागतो हे तुम्हाला माहित आहे का?

वडिल भानुप्रताप यांच्या इच्छेविरोधात हिरा ठाकूर लग्न करतो. वडिलांच्या दृष्टीने नालायक असलेला हिरा नंतर वडिलांचं मन कसं जिंकतो, असं या चित्रपटाचं कथासूत्र आहे. वडिल आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत बिग बी दिसले होते. ज्यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच वर्षी सेट मॅक्स चॅनल लाँच झाला होता. त्यावेळी काही अनाकलनीय कारणांमुळे सेट मॅक्सने सूर्यवंशमचे टेलिकास्ट राइट्स शंभर वर्षांसाठी विकत घेतले होते. म्हणूनच या चॅनलवर सतत हा चित्रपट दाखवला जातो. भारतीय चित्रपट वाहिनीवर सर्वात जास्त वेळा टेलिकास्ट झालेला हा चित्रपट आहे.

टीव्हीवर सतत सूर्यवंशम टेलिकास्ट होण्यावरून सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवली जाते. आजही त्यावरून बरेच मीम्स आणि जोक्स व्हायरल होतात. पण प्रेक्षकांना आणखी ८१ वर्षे हा चित्रपट टीव्हीवर पाहायला लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.