बॉलिवूडमध्ये येणाऱ्या सिक्वल सीरिजमध्ये ‘रेस ३’ या चित्रपटाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ‘रेस ३’ मध्ये दिसणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच समोर आले. आता महानायक अमिताभ बच्चन हे सुद्धा रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमिताभ आणि सलमानच्या चाहत्यांना आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहता येईल. २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ या चित्रपटात हे दोन्ही अभिनेते शेवटचे एकत्र दिसले होते. यात प्रियांका चोप्राचीही भूमिका होती.

‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानच्या ‘रेस ३’साठी बिग बींना विचारणा करण्यात आलीय. विशेष म्हणजे अमिताभ यांनीही सलमानसोबत काम करण्यासाठी रुची दाखवली आहे. त्यामुळे ‘एबीसीडी’ सीरिजच्या दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या रेमोचा हा आगामी चित्रपट बॉलिवूडचे शहेनशाह आणि दबंग हिरो यांच्यामुळे नक्कीच हिट ठरेल यात शंका नाही.

वाचा : सुशांत आणि सारा शूटिंगपूर्वी केदारनाथ मंदिरात नतमस्तक

अमिताभ आणि सलमान यांनी याआधी ‘बागबान’ आणि ‘बाबुल’ चित्रपटातही एकत्र काम केलेले. पण, हे चित्रपट ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न करण्यापूर्वी चित्रीत झालेले. सलमानचे वडील आणि प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान यांनीही अमिताभ यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेले. सलीम-जावेद या जोडीनेच बिग बींच्या ‘दीवार’, ‘जंजीर’, ‘मजबूर’, ‘त्रिशूल’ आणि ‘शोले’ या हिट चित्रपटांच्या कथा लिहिलेल्या. सलीम-जावेद जोडी वेगळी झाल्यानंतर बिग बींनी जावेद अख्तर यांच्यासोबत काम सुरु ठेवले. त्यामुळे बच्चन आणि खान यांच्यात काही दरी निर्माण झालेली. मात्र, आता बिग बी आणि सलमान पुन्हा एकत्र येणार असल्यामुळे जुन्या सर्व गोष्टींवर पडदा टाकण्यात आल्याचे दिसते.

वाचा : सैफच्या ‘शेफ’चे पहिले पोस्टर

‘रेस’ सीरिजमधील पहिल्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केलेले. यात सैफ अली खान, अक्षय खन्ना, अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या.