बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना आता प्रसिद्धीपासून मुक्ती हवी आहे. आता त्यांना आयुष्यात शांती हवी आहे. बॉलिवूडचे प्रसिध्द जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे बोफोर्स घोटाळा, पनामा पेपर्स आणि नुकतेच अनधिकृत बांधकामांप्रकरणी प्रसारमाध्यमातून नाव झळकले. या सगळ्यावर वक्त होतं अमिताभ यांनी रविवारी एक ब्लॉग लिहिला. या ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिले की, या वयात मला पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा मुक्ती आणि शांती हवीये. माझ्या आयुष्यातील शेवटच्या काही काळात मला एकटे राहायचे आहे. मला कोणतेही विशेषण नकोय. मला आता कोणत्याही चर्चेत यावसं वाटत नाही. मला आता प्रशंसा नकोय. मी त्यासाठी योग्य नाही असेच मला वाटते.

अमिताभ यांच्या वकिलांनी ‘बीएमसी’ने पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देत बच्चन यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केले नसल्याचे म्हटले. अमिताभ यांनी या उत्तरानंतर त्यांच्या ब्लॉगमध्ये आपले मत मांडले. मला ती नोटिस पाहायची आहे. अनेकदा मी माझ्यावर केल्या गेलेल्या आरोपांचे माझ्यापरिने निरसण करण्याचा प्रयत्न करतो. पण कधी-कधी शांत राहणेच उपयुक्त असते. ‘बीएमसी’च्या आरोपांबद्दल बोलताना त्यांनी लिहिले की, प्रसारमाध्यमांऐवजी प्रशासन व्यवस्थेने यावर तोडगा काढला पाहिजे.

अमिताभ यांनी बोफोर्स घोटाळ्याबद्दल लिहिले की, ‘गेली अनेक वर्षे आम्हाला त्रास दिला गेला, आम्हाला गद्दार ठरवले गेले, आमच्यासोबत दुर्व्यवहार केला गेला आणि आम्हाला अपमानीतही केले गेले. या घोटाळ्यातून आपले नाव वगळण्यासाठी त्यांना २५ वर्षे लागली. प्रसारमाध्यमांद्वारे जेव्हा हे वृत्त भारतात प्रसिध्द करण्यात आले तेव्हा त्यांनी मला एकच प्रश्न केला तो म्हणजे, या प्रकरणात तुमचं नाव कोणी गोवलं याचा शोध घेणार का? पण इतक्या वर्षांपासून मी जे दु:ख आणि मानसिक त्रास सहन केलाय, त्याला हे कमी करू शकणार का? माझा त्रास कमी होणार का…मला आराम देऊ शकणार का? नाही, हे नाही होणार. म्हणूनच मी प्रसारमाध्यमांना सांगितलं की मला यावर कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही, हे प्रकरण माझ्यासाठी संपलं आहे.’