बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला आज ४४ वर्षे पूर्ण झाली. आजच्याच दिवशी त्यांच्या नव्या आयुष्याचा ‘सिलसिला’ सुरु झाला होता. बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध जोडी केवळ रिअल लाइमध्येच नाही तर रिल लाइफमध्येही यशस्वी ठरली. अमिताभ यांच्या या यशस्वी कारकिर्दीत जया बच्चन यांचा मोलाचा वाटा आहे हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. पण, बिग बींच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटामागेही त्यांचा हात असल्याचे फार कमी जणांना माहित असेल.

अमिताभ यांचा १९८८ साली ‘शहेनशाह’ हा हिट चित्रपट आला होता. यात त्यांच्यासोबत मिनाक्षी शेषाद्री मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरला होता. यातील ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं’  हा संवाद तर अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात असेल. पण, या चित्रपटाची कथा जया बच्चन यांनी लिहिली होती हे तुम्हाला माहितीये का? टीनू आनंद दिग्दर्शित या चित्रपटासाठी जया यांनी कथा दिली होती. हा चित्रपट बिग बींच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. मात्र, या चित्रपटाने जया यांना फार काही प्रसिद्धी मिळाली नाही.

वाचा : अमिताभ- जयाचा ४४ वर्षांचा ‘सिलसिला’

उत्तम स्क्रिप्ट रायटर असल्याचं फार कमी जणांना माहित आहे. त्यांनी अभिनेत्री म्हणून बरीच प्रसिद्धी मिळवली. पण, त्यांचे लेखनाचे कौशल्य त्यांनी लपवून ठेवले. अमिताभ आणि जया यांनी ‘बंसी बिरजू’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘एक नजर’, ‘सिलसिला’, ‘मिली’, ‘शोले’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

लग्नाच्या या खास दिवसाचा आनंद व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन जया बच्चनसोबतचा सुरेख फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमधून त्यांनी चाहत्यांच्या शुभेच्छांबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतंय.