राज्यातील भाजपा नेते व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आज(सोमवार, ८ मार्च) जागतिक महिला दिनानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला आपलं नवीन गाणं घेऊन आल्या आहेत.

“भावनांच्या खेळामध्ये गडगडले मी गडबडले…गडगडले मी गडबडले, कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. कुणी म्हणाले या जगतातील हीच लुळी पांगळी…” असे या गाण्याचे बोल आहेत. हे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी ! असं अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे सांगितलं होतं.

तर,या अगोदर काल(रविवार)देखील त्यांनी एक ट्विट केलं होतं. “केवळ जीवन जगते आहे असे नाही, तर स्वातंत्र्याने परिपूर्ण असे स्त्रीजीवनाचे अस्तित्त्व असले पाहिजे – ह्या विषयावर माझे काही विचार मांडते आणि ह्याच बाबत स्त्री शक्तीवर आधारित डॉ. रख्माबाई चित्रपटाचे माझे गीत नक्की ऐका ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी ” असं त्यांनी आवाहन देखील केलं होतं.

Video : महिला दिनानिमित्त अमृता फडणवीसांचा खास संदेश; जनतेला केलं आवाहन

“जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला- कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी..तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा ” असंही त्यांनी ट्विट या अगोदर केलं होतं.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओत अमृता फडणवीस मराठमोळ्या अंदाजात दिसत होत्या. ‘दरवर्षीच महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाशी प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्त्रीविषयी एक वेगळी आत्मियता निर्माण होते आणि यावर्षीदेखील असं होणार. मात्र मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. महाराष्ट्रात आज स्त्री सुरक्षितता, स्त्री सशक्तीकरण आणि स्त्री प्रगती याबाबतीत खूप काही बोललं जातं आहे. पण एकीकडे असं होत असताना दुसरीकडे मात्र स्त्रीवरील अत्याचार वाढताना दिसत आहेत. स्त्रियांवर होणारे बलात्कार, घाण प्रकारे होणारी ट्रोलिंग, स्त्रियांच्या होत असलेल्या आत्महत्त्या हे प्रचंड वाढलं आहे,’ असं म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली होती.