अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी ‘धमाका’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासून कार्तिकच्या अभिनयाची चर्चा रंगू लागली आहे. या टीझरमध्ये कार्तिक एका न्यूज चॅनलच्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसत असून त्याचा लूक अनेकांच्या पसंतीस उरत आहे. या प्रोमोमध्ये कार्तिकचा तडफदार अंदाज पाहायला मिळतोय.

या सिनेमात कार्तिकसोबत मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘धमाका’ सिनेमात कार्तिकसोबत काम केल्यानंतर अमृता त्याची चाहती झाली आहे. कार्तिकसोबत काम करण्याचा अनुभव खूपच सुंदर असल्याचं म्हणत तिने कार्तिकचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत अमृता म्हणाली की, सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून तिला कार्तिक आर्यनच्या चाहत्या असलेल्या अनेक मुलींचे मेसेज येत आहेत. या चाहत्यांना कार्तिकबद्दल जाणून घ्यायचं आहे. यावर ती म्हणाली “कार्तिकसाठी वेड्या असणाऱ्या मुली पाहून मी थक्क झाले. त्याचं स्टारडम पाहून मी खूश आहे. मला त्याचा गर्व आहे आणि त्याच्यासोबत माझं प्रेम कायम राहिलं.”

एवढचं नाही तर ‘धमाका’ सिनेमातील कार्तिकचं काम पाहून अमृताने त्याचं कौतुक केलं आहे. ती म्हणाली, “कार्तिक खूपच सरळ आणि उत्तम अभिनेता आहे. व्यक्ती म्हणूनदेखील तो चांगला असून त्याच्यासोबत काम करून मला खूप छान वाटलं. तो त्याच्या संवादांवर खूप मेहनत घेतो. अलिकडच्या नव्या कलाकारांमध्ये हे फारसं आढळून येत नाही. एक यशस्वी अभिनेता बनण्याचा त्याचा संघर्ष कौतुकास्पद आहे. शिवाय मी ऐकलं आहे. की त्याने एकेकाळी ऑडीशनसाठी ट्रेनने प्रवास केला आहे. तसचं एका लहानश्या खोलीत अनेक मुलांसोबत राहत दिवस काढले आहेत. आज त्याची सर्व स्वप्न साकार झाली आहेत.”

अमृताने या मुलाखतीत कार्तिकचं भरभरून कौतुक केलं आहे. सिनेमाच्या रिलीजवेळी मी सिनेमा आणि कार्तिकबद्दल अधिक बोलेन असं ती म्हणाली आहे.