प्रभासचा बहुप्रतिक्षित ‘साहो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’नंतर त्याचा हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. निर्मात्यांनी या चित्रपटासाठी भरपूर पैसा खर्च केला आहे. विशेष म्हणजे प्रभासच्या आठ मिनिटांच्या अॅक्शन सीनसाठी निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

‘डीएनए’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभासच्या अॅक्शन सीनसाठी निर्मात्यांनी तब्बल ७० कोटी रुपये खर्चे केले आहेत. या दृश्यासाठी प्रसिद्ध हॉलिवूड अॅक्शन डायरेक्टरची नेमणूक करण्यात आली होती. अबूधाबीमध्ये याचं शूटिंग झालं होतं. चित्रपटाची जवळपास ४०० लोकांची टीम गेल्या काही महिन्यांपासून अबू धाबी इथं शूटिंग करत होती.

आणखी वाचा : सलमान खानची ऑनस्क्रीन बहीण येणार ‘बिग बॉस’च्या घरात?

प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या ‘साहो’ चित्रपटाचा बजेट जवळपास ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ इतकाच आहे. ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रभासच्या कामगिरीवर साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले असेल, याची जाणीव ‘साहो’चा दिग्दर्शक सुजीथला पूर्णपणे आहे. त्यामुळेच या चित्रपटात कोणतीही उणीव राहू नये, याची पूर्ण काळजी तो घेत आहे. प्रभास, श्रद्धाव्यतिरिक्त या बिग बजेट चित्रपटात जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर, अरुण विजय, मुरली शर्मा यांच्याही भूमिका आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.