रेश्मा राईकवार
अंधाधुन
शहाण्यांना दिसणारे जग खरे की वेडय़ाला जाणवणारे जग खरे, हा जसा प्रश्न. तसेच डोळस व्यक्तीला जे नजरेसमोर दिसते ते खरे की स्पर्शातून-संवेदनांमधून शोधणाऱ्या दृष्टिहीन व्यक्तीची चौकस नजर खरी? आणि त्यातही एखादी डोळस व्यक्ती अंधाच्या नजरेने जग शोधत असेल तर.. एकमेकांत अडकलेल्या अशा चिवित्र प्रश्नांची मालिकाच उभी करण्याचे कारणही तसेच आहे. एकापाठोपाठ एक शब्दश: अंदाधुंद कारभार वाटावा अशा घटना आपल्यासमोर घडत जातात. त्यातून बाहेर पडायचा एक चांगला मार्ग आणि एक वाईट मार्गही आपल्याला माहीत असतो. आपण तो प्रयत्न करायला जावे तर आणखी भलतेच काही घडते. इतक्या वेगाने आणि विचित्र घडणाऱ्या घटना जिथे ना त्या प्रसंगांचा थांग लागतोय ना त्यात सामील असणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा तळ गाठता येतोय.. अशा घटनांच्या चित्रविचित्र ससेमिऱ्यात अडकवून आपलीच गंमत आपल्याला अनुभवायला लावणारा असा अप्रतिम वेगळा चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी दिला आहे.
मानवी मनोव्यापाराचा उत्तम वापर करीत श्रीराम राघवन यांनी याआधीही जॉनी गद्दारपासून बदलापूपर्यंत हटके चित्रपट दिले आहेत. मात्र या वेळी स्वत:चेच मापदंड मोडून काढून उत्तम कथा, वेगवान मांडणी, अचाट व्यक्तिरेखा आणि त्यासाठी निवडलेल्या अफलातून कलाकारांचा अभिनय या सगळ्या जोरावर राघवन यांनी खेळवलेला ‘अंधाधुन’ कारभार पाहणाऱ्याला भारावून टाकतो. रहस्यमय चित्रपटांचा ठरावीक साचा असतो, तो मानवी मनाशी निगडित असेल तर त्याचीही एक मांडणी असते आणि भूतप्रेताशी निगडित असेल तरी त्याचीही एक चौकट असते. इथे मात्र आपण दृष्टिहीन आकाशच्या (आयुषमान खुराणा) नजरेतून समोर घडणारा सगळा खेळ विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत असतो. आकाश उत्तम पियानोवादक आहे. आकाशला आपल्या कलेत निपुण व्हायचे आहे आणि लंडनमध्ये कार्यक्रम करायचेत. त्याच उद्देशाने तो पुण्यात एका सामाजिक संस्थेच्या मदतीने राहतो आहे. त्याच्या मते डोळस व्यक्तीपेक्षा अंध व्यक्ती ही जास्त चौकस असते, ध्येयकेंद्रित असते. आणि याच गोष्टीचा फायदा त्याला त्याच्या कलेत होईल असेही वाटते आहे. इथे आकाश खरोखरच दृष्टिहीन आहे की तो ढोंग करतो आहे, याचं उत्तर देईपर्यंत दिग्दर्शकाने कथेत एक वेगळाच खेळ रचला आहे. जे आपण ठरवतो ते होत नाही, त्याच्या बरोबर उलट, भयंकर, अनपेक्षित असे क्षणार्धात घडून जाते तेव्हा पुढे काय?, हा एकच प्रश्न असतो. आकाशच्या बाबतीतही नेमके हेच घडते. डोळ्यावर काळा चष्मा चढवून दृष्टिहीनांचे आयुष्य जगणारा आकाश एका भयंकर घटनेचा साक्षीदार होतो. त्यात अडकल्यानंतरही त्यातून बाहेर पडण्याचा हरएक प्रयत्न त्याला आणखी विचित्र पद्धतीने गुंतवत जातो.
आकाशबरोबरच्या या खेळात दिग्दर्शक आपल्याला आणखी काही व्यक्तींची भेट घडवतो. समोर एका पद्धतीने दिसणाऱ्या पण क्षणाक्षणाला रंग बदलणाऱ्या या व्यक्ती आपल्यालाही थकवतात. या चित्रपटातील व्यक्तिरेखा हा क थेला भक्कम करणारा धागा आहे. इथे सिमी (तब्बू) आहे. तसे पाहायला गेले तर सिमी आकाशच्या आयुष्यात येण्याचा तिळमात्र संबंध नाही. पण अगदीच क्षुल्लक वाटावी आणि तितकीच भयंकर ठरावी, अशी आकाश आणि सिमीची भेट होते. या भेटीपासून सगळा ससेमिरा सुरू होतो. सत्तरच्या दशकातील हिरो प्रमोद सिन्हाशी (अनिल धवन) लग्न करून सिमी सुखी आहे. प्रमोद सिन्हांच्या भूमिकेत दिग्दर्शकाने ज्येष्ठ अभिनेते अनिल धवन आणि त्यांच्या चित्रपटांचा खुबीने वापर करून घेतला आहे. आकाशपेक्षा हुशार असलेली सिमी, दृष्टिहीन असलेल्या पण पियानोवर जादूई बोटे फिरवत सूर छेडणाऱ्या आकाशच्या प्रेमात पडलेली सोफी (राधिका आपटे), एक पोलीस इन्स्पेक्टर (मानव विज), नवरा इन्स्पेक्टर असला तरी त्याला धाकात ठेवणारी त्याची बायको (अश्विनी काळसेकर), लोकांना फसवून त्यांचे अवयव विकणारा डॉक्टर अशा अनेक व्यक्तिरेखा आपल्याला चित्रपटात दिसतात. विशेष म्हणजे या चित्रपटात दिसणारी प्रत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची आहे. अगदी पोलिसालाच सिमीला सहज जाऊन तिसरा माणूस कोण होता हे विचार असे सांगणारी सिमीची शेजारीणही तितकीच लक्षात राहते. आणि लॉटरीवाली लक्ष्मी, तिचा भाऊ सगळेच या खेळातले महत्त्वाचे धागेदोरे आहेत. हे धागे कुठेही एकमेकांत अडकून गुंता निर्माण करीत नाहीत. तर रहस्याचे जाळे अलगद विणत राहतात. हे दिग्दर्शकाचे सगळ्यात मोठे यश आहे. यात दिसणाऱ्या व्यक्तिरेखा जितक्या अर्थपूर्ण आहेत तितक्याच न दिसणाऱ्या पण ऐकू येणाऱ्या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. त्यातला महत्त्वाचा आहे तो पियानोचा सूर आणि जुनी गाणी. हा पियानोचा सूर प्रत्येक प्रसंगात मोलाची भूमिका बजावतो. किंबहुना अनेकदा दृष्टिहीन आकाशच्या मनात चाललेल्या शांत कल्लोळाची सुरेल खळबळ पियानोच्या सुरातून उमटत राहतो.
अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट रसिकांसाठी पर्वणी आहे. तब्बूच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा सिमीची भूमिका अत्यंत वेगळी आहे. आजवर सतत गोड गोड वाटणाऱ्या चॉकलेटी नायकाच्या प्रतिमेला मोठाच धक्का देत आयुषमानही इथे वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आला आहे. वरुण धवनच्या बाबतीत बदलापूरच्या नायकाची भूमिका देऊन जी नवलाई श्रीराम राघवन यांनी साधली होती तेच पुन्हा आयुषमानच्या बाबतीतही त्यांनी घडवले आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने अगदी छाया कदम आणि झाकीर हुसैनसारख्या कलाकारांनीही छोटेखानी भूमिका लक्षवेधी केल्या आहेत. इतक्या सगळ्या अजब गोष्टींचे प्रयोग एकत्र करूनही न फसता केलेला ‘अंधाधुन’ हा मास्टर कलाकृती म्हणता येईल असा अचाट चित्रानुभव आहे.
* दिग्दर्शक – श्रीराम राघवन
* कलाकार – आयुषमान खुराणा, तब्बू, राधिका आपटे, अनिल धवन, मानव विज, छाया कदम, अश्विनी काळसेकर, झाकीर हुसैन.