अशी एखादी भूमिका आहे का जी अनिल कपूरने आतापर्यंत साकारली नाही ? याचं उत्तर नाही असंच येईल. विविध भूमिका साकारणारा अनिल कपूर आता ‘मुबारका’ चित्रपटात एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात अनिल कपूर एका सरदारची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि अर्जुन कपूर ही काका-पुतण्याची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.

‘मुबारका’चा नवीन पोस्टर अर्जुन कपूरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. या पोस्टरसोबतच चित्रपटाचा ट्रेलर २० जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे अर्जुनने ट्विटमध्ये म्हटलंय. त्याचबरोबर चित्रपटातील अनिल कपूरच्या भूमिकेचं नावदेखील या ट्विटमध्ये सांगितलंय. ‘करतार सिंग तुमची मनं जिंकायला येतोय,’ असं अर्जुनने या ट्विटमध्ये म्हटलंय. अनिल कपूरनेदेखील चित्रपटाचं पोस्टर ट्विटरवर टाकत कॅप्शनमध्ये, ‘ओ सत श्री अकाल पाजी, अस्सी करतार सिंग’ म्हणत आपल्या भूमिकेची ओळख करून दिलीये. या चित्रपटामध्ये एका कमाल कुटुंबाची धमाल गोष्ट पाहता येणार आहे.

अनीस बाझमी दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन कपूर दुहेरी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अनीस आणि अभिनेता अनिल कपूरची जोडी चौथ्यांदा एकत्र काम करणार आहे. याआधी ‘नो एण्ट्री’, ‘वेलकम’ आणि ‘वेलकम बॅक’ या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलंय. २८ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आणि अथिया शेट्टीसुद्धा महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

VIDEO : ‘मन्नत’बाहेर सलमान शाहरुखला आवाज देतो तेव्हा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटासोबतच कुणार कपूरचा ‘रागदेश’सुद्धा २८ जुलैला प्रदर्शित होतोय ज्यामध्ये कुणाल कपूरसोबतच अमित साध आणि मोहित मारवाह यांच्या मुख्य भूमिका आहेत. मोहित मारवाह अर्जुनचा चुलत भाऊ आणि अनिल कपूरचा पुतण्या आहे. त्यामुळे एकाच दिवशी दोन भावांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.