डिस्नेच्या नव्या ‘जंगल बुक’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. कारण बऱ्याच वर्षांनंतर गीतकार गुलजार यांनी वर्णन केलेला हा चड्डी पहनके बाहेर पडलेला मोगली पुन्हा एकदा भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर आला होता. फक्त या वेळी या मोगलीचा चेहरा अॅनिमेटेड नव्हता तर तिथे एक खरोखरच लहान, निरागस भाव असलेला चेहरा मोगली म्हणून खऱ्याखुऱ्या प्राण्यांच्या जंगलात वावरताना दिसला. त्याला जोड होती ती बॉलिवूड कलाकारांच्या आवाजाची. आता हाच मोगली सीरिजच्या माध्यमातून नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.
येत्या ७ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर ‘मोगली- लेजंड ऑफ द जंगल’ हिंदी व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार आहे. या हिंदी व्हर्जनमधील पात्रांना बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी आवाज दिला आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत फेसबुक पेजवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
अभिनेत्री करिना कपूर खान ‘का’ या पात्रासाठी आवाज देणार आहे. तर बगिरासाठी अभिषेक बच्चन, बालूसाठी अनिल कपूर, शेर खानसाठी जॅकी श्रॉफ आवाज देणार आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित डिजीटल प्लॅटफॉर्मसाठी पहिल्यांदाच काम करत आहे. माधुरी निशा या पात्रासाठी आवाज देणार आहे.
रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘द जंगल बुक’ या पुस्तकावर ‘मोगली- लेजंड ऑफ द जंगल’ बेतलेला आहे. अँडी सर्कीजने याचे दिग्दर्शन केले असून मोगलीच्या भूमिकेत भारतीय वंशाचा अमेरिकन कलाकार रोहन चांद दिसणार आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी व्हर्जनला हॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांनी आवाज दिला आहे.