Age is just a number अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांना पाहिल्यावर या म्हणीची आवर्जून आठवण होते. अशाच सदाबहार कलाकारांपैकी आघाडीचं नाव म्हणजे अभिनेता अनिल कपूर. अनिल कपूर यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही अनिल कपूर यांची फिटनेस तरुणाईला लाजवेल अशी आहे. फिटनेसबरोबरच अनिल कपूर हे त्यांच्या भूमिकांसाठी आणि १९८० च्या दशकापासून आतापर्यंतच्या अनेक चित्रपटांमधील संवादांसाठी ओळखले जातात. मात्र त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय झालेला आणि कदाचित सर्वात छोटा संवाद म्हणजे, ‘झक्कास’ हा शब्द. तसा हा शब्द आहे मराठी मात्र त्याचा उल्लेख करतानाच केसांवरुन हात फिरवणाऱ्या अनिल कपूर यांची हिरोगिरी आठवल्याशिवाय राहत नाही. मात्र हा शब्द अनिल कपूर यांच्याशी कसा जोडला गेला याचा खुलास अनिल कपूर यांनीच एका ट्विटमध्ये केला होता.

झालं असं की महिंद्रा अॅण्ड महिंद्रांचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी मागील वर्षी एक ट्विट केलं होतं.  महिंद्रा यांच्या ट्विटला अनिल कपूर यांनी उत्तर दिलेलं. आनंद महिंद्रा यांनी माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नासकॉम या संघटनेच्या एका कार्यक्रमामध्ये एक भाषण दिले. या भाषणात त्यांनी भारतीयांची विचारसरणी ‘जुगाडकडून झकासकडे’ जात असल्याचे म्हटले. काम करायचं म्हणून करायचं या जुगाड प्रकारच्या विचारसणीकडून भारतीय आता झकास म्हणजेच जगावेगळा विचार करण्याकडे भर देत असल्याचे महिंद्रा यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं. या भाषणातील काही मुद्दे नासकॉमच्या ट्विटर अकाऊण्टवरुन पोस्ट करण्यात आले.

Anil Kapoor Birthday Special : मजनू भाईंचे हे भन्नाट Memes नेटकऱ्यांना कायमच खदखदून हसवतात

हे ट्विट कोट करुन रिट्विट करत आनंद महिंद्रा यांनी झकास या शब्दाचा उगम कसा झाला याबद्दल आपल्या फॉलोअर्सकडे विचारणा केली. तसेच झकास या शब्दाचा आपल्यासाठी काय अर्थ आहे हे ही त्यांनी सांगितले. “खरं तर मी (या भाषणामध्ये) Wow या इंग्रजी शब्दासाठी भारतीय भाषेतील शब्द शोधत होतो. त्याच अर्थाचा शब्द म्हणून मी झकास हा शब्द वापरला. मात्र या शब्दाचा उगम कसा झाला हे मला ठाऊक नसून तो केवळ महाराष्ट्रातच वापरला जातो का याचाही मला काही अंदाज नाही. कोणाला याबद्दल काही ठाऊक आहे का?,” असे ट्विट महिंद्रा यांनी केलं होतं.

महिंद्रा यांच्या या ट्विटला अभिनेता अनिल कपूर यांनी अगदी मजेशीर रिप्लाय दिलेला. यामध्ये मी हा शब्द माझ्या एका सिनेमामध्ये वापरला आणि तिथूनच तो लोकप्रिय झाल्याचे अनिल कपूर म्हणाले. “या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल मला सांगता येणार नाही. पण हा शब्द लोकप्रिय करण्यात माझा हातभार नक्कीच आहे. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या युद्ध या चित्रपटामध्ये मी साकारलेल्या भूमिकेसाठी हा शब्द अनेकदा वापरला. उदाहणार्थ मी आनंद महिंद्रांचा खूप आदर करतो कारण माझ्या मते ते झकास आहेत,” असं ट्विट अनिल कपूर यांनी केले.

आनंद महिंद्रा यांनी अनिल कपूर यांच्या ट्विटची दखल घेत त्यांना उत्तरही दिलं होतं. अनिल कपूर यांनी रिप्लाय म्हणून केलेले ट्विट कोट करुन रिट्विट करत महिंद्रा यांनी शब्दाचा अर्थ समजवून सांगितल्याबद्दल आभार मानले. “हाहाहाहा… या शब्दाचा इतक्या छान पद्धतीने अर्थ समजवून सांगितल्याबद्दल धन्यवाद. हा शब्द वापरुन मी बौद्धिक संपत्तीच्या (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुम्ही मला कोर्टात खेचणार नाही अशी मी प्रार्थना करतो,” असे ट्विट महिंद्रा यांनी केले.

दरम्यान, या तिन्ही ट्विटवर वाचकांनाही मजेदार रिप्लाय करुन या दोघांमधील संवादाचा पुरेपुर आनंद घेतल्याचे या ट्विटला मिळालेल्या रिप्लायवरुन दिसत होतं.