‘शक्ति – अस्तित्व के एहसास की’ मालिकेत काम करणारा अभिनेता अनिरुद्ध दवेची २३ एप्रिल रोजी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या २९ दिवसांपासून अनिरुद्ध करोनाशी लढा देत आहे. दरम्यान त्याने पत्नीसाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

आज अनिरुद्धची पत्नी शुभीचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभी. सध्याच्या कठीण काळाता तुला दिलेल्या शुभेच्छा फार वेगळ्या आहेत. आज मला हॉस्पिटलमध्ये २९ दिवस झाले. पण तू आणि अनिश्क मला करोनाशी लढण्यासाठी आणखी ताकद देता. शांत राहण्यासाठी, लढण्यासाठी तुम्हा दोघांचे शब्द मला ताकद देतात’ असे त्याने म्हटले आहे.

आणखी वाचा : गर्लफ्रेंडसाठी अभिनेत्रीने केली लिंगबदल सर्जरी, शेअर केला शर्टलेस फोटो

पुढे तो म्हणाला, ‘३०, १ आणि २ रोजी जेव्हा तू मला भेटायला आली तेव्हा मी कोणालाही ओळखू शकत नव्हतो. पण कोणीतरी मला सांगितले की शुभी मला पाहण्यासाठी आयसीयूमध्ये आली होती. तेव्हा तू लस घेतली नव्हतीस आणि अनिश्कला ठेवून मला भेटायला आलीस. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की माझी प्रकृती गंभीर आहे तेव्हा तू आणि अनिश्कने मला करोनाशी लढण्याची ताकद दिली. तो खूप कठीण काळ होता. मी बोलू शकत नाही म्हणून ही पोस्ट लिहिली आहे. मी लवकरच घरी परत येईन’

अनिरुद्ध भोपाळमध्ये एका वेब सीरिजचे शूटिंग करत होता. शूटिंग दरम्यानच त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर तो हॉटेलमध्ये क्वारंटाइन होता. पण प्रकृती बिघडल्यामुळे त्याला भोपाळमधील एका रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचे समोर आले आहे.