अंकिता लोखंडे हे नाव आता नवीन राहिलेलं नाही. टिव्ही जगतातील ती नावाजलेली अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील ‘अर्चना’ या व्यक्तिरेखेमुळे ती घराघरात पोहोचली. याच मालिकेदरम्यान अंकिताची सुशांत सिंग राजपूतशी ओळख झाली आणि नंतर मैत्री. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात व्हायला फारसा वेळ लागला नाही. काही काळाने हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहत होते. छोट्या पडद्यावरचे हे एकेकाळचे हॉट कपल होते. सुशांतने ‘झलक दिखला जा’ या शोच्या सेटवर अंकिताला प्रपोज केले होते. पण, त्यांच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली आणि या दोघांनी वेगळं होण्याचा मार्ग स्वीकारला.सुशांत आणि अंकिता यांच्या ब्रेकअपला आता वर्ष उलटून गेलंय. दोघांनी मिळून हा निर्णय घेतला असून आता दोघंही आपआपल्या मार्गाने पुढे जात आहेत. पण त्यांच्या चाहत्यांना मात्र ते अजूनही एकत्र आहेत असेच वाटते.

अंकिताने नुकतेच एक फोटोशूट केले. या फोटोशूटपैकी काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. अंकिताचे हे फोटो तिच्या चाहत्यांना फार आवडले. पण काही इन्स्टाग्राम युझर्सनी मात्र त्यावर अश्लिल कमेंट केल्या. तिने फोटोशूटसाठी दिलेल्या पोझ या अश्लील आहेत असे काहींनी म्हटले. हे कमी की काय काहींनी तिच्या या फोटोंमध्ये सुशांत सिंग राजपूतलाही ओढले.

दरम्यान, कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमातून अंकिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तेव्हा आता खासगी आयुष्य आणि रिलेशनशिपपेक्षा अंकिता तिच्या करिअरलाच प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळतंय. या सिनेमा व्यतिरिक्त अंकिताने बॉलिवूडमधील तिचा दुसरा सिनेमाही साइन केला आहे.

आगामी ‘तोरबाज’ या सिनेमातून अंकिता संजूबाबासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्त या सिनेमात सैन्यदल अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून, डिसेंबर महिन्यात या सिनेमाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल. अफगाणिस्तानातील अल्पवयीन आत्मघातकी हल्लेखोरांभोवती सिनेमाचं कथानक फिरणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Story img Loader