‘पद्मावत’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाबाबत एक महत्त्वाचा निकाल दिला असून, २५ जानेवारी रोजी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. एकीकडे पद्मावतसारखा ऐतिहासिक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असताना दुसरीकडे ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचे चित्रीकरण जोरात सुरु आहे. मणिकर्णिकामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या अंकिता लोखंडेनी नुकतीच ‘मुंबई मिरर’ला एक मुलाखत दिली. त्यावेळी तिने काही गोष्टींचा खुलासा केला. पद्मावत चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी तिला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र त्यावेळी अंकिताची तयारी नसल्याने तिने तो चित्रपट नाकारला होता.

संजय लीला भन्साळींबद्दल बोलताना अंकिता म्हणाली की, ‘मी संजय सरांना खूप मानते. माझ्यातील टॅलेंट पाहून त्यांनी मला जास्त वेळ वाया न घालवण्याचा सल्ला दिला होता. पण पद्मावतसारखेच आमच्या चित्रपटाबाबत काही घडले तर आम्हाला फार वाईट वाटेल. कारण या चित्रपटासाठी फार संशोधन करण्यात आले आहे. जर ‘पद्मावत’सारखेच काही आमच्या चित्रपटाबाबत घडले तर आम्ही चित्रपटासोबत ठामपणे उभे राहू.’

सध्या अंकिताच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून यामध्ये कंगना रणौतची मुख्य भूमिका आहे. कंगना ही आपल्याला कायम प्रेरणा देणारी अभिनेत्री आहे असे अंकिताने यावेळी सांगितले. कंगनाबाबत बोलताना अंकिता म्हणाली, ‘सेटवर असताना ती पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रित करते. तुम्हाला सेटवर कंगना नाही तर फक्त राणी लक्ष्मीबाईच दिसेल. कंगना या चित्रपटात हिरो असून तिने हिरोईन म्हणून मला लाँच केलं आहे. एखाद्याला लाँच करणं कठीण काम नाही, पण योग्य संधी देणं महत्त्वाचं आहे. ती योग्य संधी मला मिळाली आहे. मी चित्रपटात झलकारी बाईची भूमिका साकारत असून त्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे.’ या चित्रपटाची संहिता ‘बाहुबली’चे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात ऐतिहासिक कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.