बॉलीवूड अभिनेता सुशातं सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवीन माहिती समोर येत आहे. सुशांत यांच्या जवळील लोकांची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या घराचे हप्ते सुशांत भरत होता, असा आरोप काही जणांनी लावला होता. या बातमीचं खंडन करुन आरोप करणाऱ्यांना अंकिता लोखंडेनं आरसा दाखवला आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडेनं आरोप करणाऱ्यांना सडेतोड प्रतिउत्तर दिलं आहे. अंकिता लोखंडेनं सोशल मीडयावर बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे पोस्ट केली आहेत. त्यावरुन फ्लॅटचा हप्ता अंकिता स्वत: भरत असल्याचं दिसत आहे. तसेच घर घेताना बँकेच्या कागदपत्रावर अंकिता लोखंडेची खात्याची माहिती आहे. अंकिताने सर्व कागदपत्रे पोस्ट करत आरोप करणाऱ्यांचं तोंड बंद केलं आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या फ्लॅटचं रजिस्ट्री कागज पोस्ट करताना लिहलेय की, ‘माझ्यावर होत असलेल्या आरोपाचं मी खंडन करतेय. यापेक्षा आधिक ट्रांसपेरेंट होऊ शकत नाही. माझ्या फ्लॅटचे रजिस्टर कागदपत्रे आणि बँक डिटेल्स. यामध्ये तूम्ही पाहू शकता. एक जानेवारी २०१९ ते एक मार्च २०२० पर्यंत माझ्या खात्यातून पैसे कट झाले आहेत.’ अंकिताच्या या पोस्टवर सुशांत राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने कमेंट केली आहे. श्वेता सिंह म्हणते, ‘तू स्वतंत्र मुलगी असल्याचं मला माहित आहे. याचा गर्व आहे.’ अंकिता लोखंडेनं ही कागदपत्रे पोस्ट केल्यानंतर काही चात्यांनी तिच्या सपोर्टमध्ये मत व्यक्त केलं आहे. तू आत्मनिर्भर असल्याचं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, असे एका चाहत्यानं ट्विट करत अंकिताला दिलासा दिला आहे.
ईडीला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने अंकितासाठी मालाडमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत तब्बल चार कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. या फ्लॅटचे ईएमआय सुशांत भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहतेय. रिया चक्रवर्तीने केलेल्या दाव्यानुसार सुशांतला हा फ्लॅट रिकामा करायचा होता. परंतु अंकिता हा फ्लॅट सोडण्यास तयार नव्हती.
अंकिता लोखंडे सध्या सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी यासाठी सोशल मीडियावर जोरदार आवाज उठवत आहे. अलिकडेच तिने “सुशांतसोबत नेमकं काय घडलं? हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचं आहे. सुशांतची केस CBI कडे सोपवावी. #CBI for SSR” अशा आशयाचं ट्विट देखील केलं होतं.
अंकिता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड होती. सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. दरम्यान त्या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. जवळपास पाच वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. दोघे लग्न करणार अशा चर्चा होत्या. दरम्यान २०१३ मध्ये सुशांतने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्या दोघांचं ब्रेकअप झालं. अंकितासोबत ब्रेकअप केल्यानंतर सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.