‘देवा एक अतरंगी’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या आयुष्यात नवा रंग भरण्यास सज्ज झाला आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित ‘देवा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला. कोणताही चित्रपट पडद्यावर साकार होण्यामागे, पडद्यामागील तंत्रज्ञ मंडळी आणि युनिट मेंबरचा महत्त्वाचा हातभार असतो, त्यामुळे ‘देवा’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आपल्या पहिल्या टीझरच्या अनावरण सोहळ्यात प्लाझा चित्रपटगृहातील सर्व कर्मचाऱ्यांना सोबतीला घेत, मराठी सिनेसृष्टीत एक नवा पायंडा उभारला.

वाचा : थ्री-डीतूनही दिसणार ‘पद्मावती’चे सौंदर्य?

‘देवा’ चित्रपटाच्या टीझरमधून मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी पंडित प्रथमच एका नव्या लुकमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. यात ती एका लेखिकेच्या भूमिकेत दिसून येते. चित्रपटच्या टीझरमध्ये, तिने साकारलेली ‘माया’ या व्यक्तिरेखेच्या नजरेतून ‘देवा’ चा शोधप्रवास आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय अतरंगी देवाच्या रंगबेरंगी छटा या ट्रेलरमध्ये दिसून येतात. त्याचसोबत डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकारदेखील आपणास पाहायला मिळतात.

वाचा : रवी जाधव घेऊन येतोय ‘न्यूड’

विशेष म्हणजे यापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘देवा’ चित्रपटाचा पोस्टर आणि मोशन पिक्चर्समध्ये आतापर्यंत पाठमोरा दिसणारा अंकुश चौधरीदेखील प्रेक्षकांसमोर आला असल्यामुळे, त्याच्या चाहत्यांसाठी हा टीझर खास ठरत आहे. मायाच्या नजरेतला हा ‘देवा’ प्रेक्षकांसाठी मोठा कुतूहलाचा विषय ठरत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक मुरली नल्लप्पा दिग्दर्शित हा चित्रपट १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल.