मंगळवार सकाळपासून मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं. नऊ तासांमध्ये शहरात २९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे २६ जुलैच्या आठवणी जाग्या झाल्या. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवाही ठप्प झाली होती. ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवरही परिणाम झालेला. बुधवारी सकाळपासून परिस्थितीत सुधारणा झाली असून बस आणि लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येतेय.

परिणीती चोप्रा, दिया मिर्झा, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा या कलाकारांनी ट्विट करत परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना काळजी घेण्याचा इशारा दिला. तर सामान्य मुंबईकरांसोबतच अभिनेते अनुपम खेर, आर. माधवनसुद्धा मंगळवारी पावसात अडकले होते.

महेश भट्ट यांनी पावसात अडकलेल्या त्यांच्या कारचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, ‘काही अनोळखी व्यक्तींनी योग्य वेळी आम्हाला कारमधून बाहेर काढलं. (खार पश्चिम, मुंबई संध्याकाळी ४.३० वाजता)’ आलिया भट्टने हा ट्विट रिट्विट करत मुंबईकरांना काळजी घेण्याचा इशारा दिला. अभिनेता आर माधवननेसुद्धा इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याची कार पाण्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय. ‘माझी कार पाण्यात अडकल्यामुळे गुडघाभर पाण्यातून घरी जावं लागलं,’ असं त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनासुद्धा अडचणीचा सामना करावा लागला. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं की, ‘मुसळधार पावसात माझी कार अडकली. एका मित्राला मदतीसाठी मी बोलावलं. तो आणि त्याची मुलगी माझ्या बचावासाठी आले. आता मी सुखरुप घरी पोहोचलो.’

PHOTOS : शाहिद-मीराने असा साजरा केला मिशाचा पहिला वाढदिवस

दरम्यान येत्या ४८ तासांत मुंबईत पावसाचा जोर कायमच राहणार असल्याने, पालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, गरज नसल्याच घराबाहेर पडू नका, असा संदेश जारी केला आहे. बुधवारीही मुंबईसह कोकण किनारपट्टीवर काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.