‘मामी मूवी मेला’मध्ये अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते चित्रपटसृष्टीशी निगडीत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी एकत्र जमतात. पाच प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये अशीच एक चर्चा झाली. यामध्ये अनुराग कश्यप, नितेश तिवारी, कबीर खान, अलंक्रिता श्रीवास्तव आणि अयान मुखर्जी यांचा समावेश होता. चित्रपट व्यवसाय या विषयावर ही चर्चा रंगली असतानाच दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि एका चाहत्यामध्ये बाचाबाची झाली.

चर्चेदरम्यान एका चाहत्याने अनुरागला प्रश्न विचारला आणि त्यामुळेच अनुरागचा राग अनावर झाला. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार या चर्चेसाठी उपस्थित असलेल्या श्रोत्यांनाही त्यांच्या आवडत्या दिग्दर्शकाला प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. ‘दिग्दर्शक उत्तम चित्रपट कथेऐवजी मोठ बजेट आणि मोठी स्टार कास्ट यावरच का लक्ष केंद्रीत करतात?,’ असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. त्यावर अनुरागने उत्तर दिले की, ‘जर उत्तम कथेवर प्रेक्षक भर देऊ लागले आणि तसेच चित्रपट पाहण्यासाठी जाऊ लागले, तर दिग्दर्शक नक्कीच मोठ बजेट आणि मोठी स्टार कास्ट याला कमी महत्त्व देतील.’

वाचा : सनी देओलचा मुलगा पहिल्याच चित्रपटाचं शूटिंग अर्धवट सोडून परतला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुरागच्या या विधानाला चाहत्यानेही प्रत्युत्तर देत म्हटले की, ‘कमी बजेट असलेले चित्रपट मी पाहतो.’ यावर चिडून अनुराग पुढे म्हणाला की, ‘फक्त तुम्ही एकट्याने असे चित्रपट पाहून काहीच होणार नाही. प्रत्येकाने तसा विचार केला पाहिजे.’ अनुरागला मध्येच थांबवत तो चाहता पुन्हा प्रश्न विचारु लागला तेव्हा अनुरागचा संयम सुटला. ‘तुम्हाला मी काय म्हणतोय हे ऐकायचं आहे की फक्त स्वत:च बडबडत बसायचं आहे,’ असं म्हणत अनुरागने त्याला सुनावलं. त्याला चिडलेला पाहून अखेर चाहत्याने माघार घेतली.