बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. गेल्या काही काळात तो सातत्याने मोदी सरकारच्या वादग्रस्त निर्णयांविरोधात आवाज उठवताना दिसत आहे. या सोशलबाजीमुळे त्याच्यावर अनेकदा ट्रोल होण्याची वेळ देखील येते. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला. एका नेटकऱ्याने ‘जस्टिस फॉर धनिराम’ असे म्हणत अनुरागला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु अनुरागने त्याला त्याच्याच शैलीत प्रत्तुत्तर दिले.

जेनिश पटेल या ट्विटर हँडलवरुन अनुराग कश्यपसाठी एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला. या व्हिडीओमध्ये एक जखमी व्यक्ती दिसत आहे. “मध्यप्रदेशामधील एका दलित कुटुंबातील धनिराम नामक व्यक्तीला चार मुस्लीम लोकांनी त्याच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याच्या शरीराचा ६० टक्के भाग भाजला होता. आणि रुण्गालयात पोहोचताच त्याचा मृत्यृ झाला.” असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला. तसेच “धनिरामला न्याय मिळवून देण्यासाठी अनुराग तुम्ही ट्विट केले का?” असा प्रश्न देखील विचारण्यात आला.

या ट्विटवर अनुरागने त्याच्याच शैलीत प्रत्तुत्तर दिले. “धनिराम प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र JNU मधील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. त्यांना अटक कधी करणार? लोकांना भडकावण्यासाठी अर्धवट माहिती देऊ नका. खरं बोला.” अशा आशयाचे ट्विट करुन अनुरागने त्या नेटकऱ्याला गप्प केले.