सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत आहे. ट्विटरवर पदार्पण करत कंगनाने अनेकांवर हल्लाबोल केला. बॉलिवूडमधील ड्रग्सच्या मुद्द्यावरूनही ती चर्चेत राहिली. ‘देशाच्या सन्मानासाठी मी नेहमीच आवाज उठवेन’, अशा आशयाचं एक ट्विट कंगनाने केलं होतं. त्यावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिची थट्टा केली. ‘एक काम कर, तू चार-पाच जणांना घेऊन भारत-चीन सीमेवर लढायला जा’, असा उपरोधिक सल्लाच अनुरागने कंगनाला दिला.

काय होतं कंगनाचं ट्विट?

‘मी क्षत्रिय आहे. सर कटा सकती हूं, शिरच्छेद करु शकते मात्र नतमस्तक होऊ शकत नाही. देशाच्या सन्मानासाठी मी नेहमी आवाज उठवेन. मान, सन्मान आणि स्वाभिमानासह मी जगतेय आणि गर्वाने राष्ट्रवादी म्हणून जगत राहीन. माझ्या नीतीमूल्यांशी मी कधीच तडजोड केली नाही आणि कधी करणारही नाही. जय हिंद!’, असं ट्विट कंगनाने केलं होतं.

कंगनाच्या ट्विटवर अनुराग कश्यपचा सल्ला-

‘फक्त तूच एक आहेस बहीण- एकमेव मणिकर्णिका. चार- पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर जा. त्यांना पण हे दाखवून दे की जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत या देशाचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. तुझ्या घरापासून LAC पर्यंत फक्त एका दिवसाचा प्रवास आहे’, असा उपरोधिक सल्ला अनुरागने कंगनाला दिला.

अनुरागला कंगनाचं उत्तर –

अनुरागच्या ट्विटला कंगनाने उत्तर दिलं, ‘ठीक आहे, मी सीमेवर जाते आणि तुम्ही ऑलिम्पिकमध्ये भाग घ्या. देशाला सुवर्णपदक पाहिजेत. हा कोणता बी ग्रेड सिनेमा नाही जिथे कलाकार कोणतीही भूमिका साकारेल. तुम्ही इतके मंदबुद्धी कसे झालात. जेव्हा आपली मैत्री झाली होती तेव्हा तर फार हुशार होता.’