दिग्दर्शक अनुराग कश्यपने ‘मुंबई अकॅडमी ऑफ मूविंग इमेज’च्या (MAMI) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ‘मामी’च्या स्थापनेपासून अनुराग बोर्डाचा सदस्य होता. ‘फँटम फिल्म्स’ या निर्मिती संस्थेत अनुरागचा सहकारी राहिलेला दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले. या आरोपांनंतर त्याच्याविरोधात काहीच कारवाई न केल्याचा ठपका अनुरागवर लावण्यात आला. जोपर्यंत हा ठपका पुसला जात नाही तोपर्यंत मी सदस्यपदावर परत येणार नाही, असं अनुराग म्हणाला.

विकास बहलवर झालेल्या आरोपांनंतर ‘फँटम फिल्म्स’ ही निर्मिती संस्था बंद करण्यात आली. अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, विकास बहल आणि मधू मंटेना अशा चौघांची भागीदारी या कंपनीत होती. ‘सध्या घडत असलेल्या घटनांमुळे मी ‘मामी’च्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आरोपांवर पडदा टाकण्याचा आणि काहीच कारवाई न केल्याचा ठपका जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मी पदावर परत येणार नाही,’ असं ट्विट अनुरागने केलं.

#MeToo : मराठी असण्याचा प्रश्न नाही; जे चूक आहे ते चूकच आहे- सई ताम्हणकर

विकास बहल प्रकरणाचे स्पष्टीकरण देणारी मोठी पोस्ट लिहून अनुरागने पीडित महिलेची माफी मागितली होती. ‘विकास बहलने पीडित कर्मचारी महिलेसोबत जे कृत्य केले त्याची मला माहिती होती. मात्र, तरीही कंपनीच्या धोरणांनुसार आपण या प्रकरणात कायदेशीररित्या काहीही करु शकलो नाही. मात्र, तरी वैयक्तिकरित्या त्या पीडित महिलेला माझ्याकडून जितकी होऊ शकेल तितकी मदत मी केली,’ असं अनुरागने ट्विटमध्ये लिहिले होते.