‘इट्स कन्फर्म्ड’, असे म्हणत विराट, अनुष्काने आपला विवाह झाल्याचे घोषित केले. त्यानंतर सोशल मीडियावर या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरूवात झाली. विराट अनुष्काच्या लग्नातील काही फोटो या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. या छायाचित्रांमधील विराट आणि अनुष्काचा लूक अगदी दृष्ट लागण्यासारखा आहे. आगामी काळात दोघांच्या चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या लूकच्याबाबत कॉपी केले तर आश्चर्य वाटायला नको. सध्याचा लग्नसराईचा माहोल सुरु असून येत्या काही महिन्यांमध्ये ज्यांची लग्न होणार आहेत, त्या कपल्समध्ये किंबहुना संपूर्ण चाहत्या वर्गामध्ये ‘विरुष्का’चा वेडिंग लूक चर्चेचा विषय ठरतोय.
इटलीतील टस्कनीमध्ये असणाऱ्याएका आलिशान रिसॉर्टमध्ये विराट- अनुष्काने सात जन्माच्या शपथा घेतल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता. विराट आणि अनुष्काच्या लग्नाच्या वेळचा पेहरावही अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. विवाह सोहळ्याच्या विधींसाठी या दोघांनीही हलक्या पण, तितक्याच मोहक रंगाची रंगसंगती असणारा पारंपरिक आणि मॉडर्न टच असणारा पोषाख घातला होता. ऑफ व्हाईट, गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये अनुष्का अगदी सुरेख दिसत होती. फ्लॉरल डिझाईन आणि त्याला साजेशा दागिन्यांमुळे तिचे सौंदर्य आणखीन खुलून आले होते. माथापट्टी, मांगटिका, लाल रंगाचा चुडा, नथनी या गोष्टींमुळे तिचा लूक अधिक उठावदार दिसत होता. तर विराटही तिच्या पत्नीच्या लेहंग्याला साजेशा रंगसंगतीतील शेरवानी आणि फेट्यात अस्सल ‘पंजाबी दुल्हा’ वाटत होता. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने या दोघांच्याही कपड्यांचे डिझाईन केल्याचे म्हटले जाते आहे. प्रचंड गोपनीयता पाळत अखेर विरुष्काच्या प्रेमकहाणीचा हा क्लायमॅक्स सध्या अनेकांचीच पसंती मिळवतोय असे म्हणायला हरकत नाही.