दृष्टी नसली तरी जग संपत नाही, पण समस्यांमध्ये मात्र भर पडते. अंध विद्यार्थ्यांना १० वी-१२ वीपर्यंत जास्त समस्या येत नसल्या तरी त्यानंतर मात्र त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत जाते. जिथे १२वीनंतर अभ्यासक्रमांच्या पुस्तकांची वानवा असते तिथे करिअर घडवण्याचा काय विचार करणार? पण जे हरण्याचा विचार करत नाहीत तेच जिंकतात, असाच जिंकण्याचा निर्धार त्यांनीही केलाच. आम्ही अंध असलो तरी आम्हाला सहानुभूतीची नाही तर संधीची गरज आहे. आम्हाला संधी द्या आणि बघा, असं म्हणत ते १९ अंध विद्यार्थी एकत्र आले. धडधाकट व्यक्तींसाठीही जे आव्हान असतं ते पेलायचं त्यांनी ठरवलं आणि रंगभूमीवर आलं ‘अपूर्व मेघदूत’ हे नाटक.
जवळपास २५ वर्षांपासून स्वागत थोरात हे अंध व्यक्तींसाठी काम करतात. फक्त प्रशिक्षणच नाही तर त्यांना घेऊन नाटकही बसवतात. या मुलांनी थोरात सरांना आपली मनीषा सांगितली. थोरात सरही चांगल्या संहितेच्या शोधात होते, गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी एकही नाटक केलं नव्हतं. गणेश डिगे हे लेखक सात वर्षांपासून मेघदूत करत होते. त्यांच्याकडे चांगली संहिता होती. त्यांनी ‘अपूर्व मेघदूत’ची संहिता थोरात सरांना ऐकवली आणि त्यांना ती आवडली. आता आव्हान होते ते नाटक बसवण्याचे. नाटक बसवणं हे आव्हानच, पण ते अंध मुलांना घेऊन बसवणं कर्मकठीण समजलं जातं. या नाटकाची ८० दिवस तालीम त्यांनी घेतली. त्यानंतर आठ रंगीत तालमी झाल्या आणि नाटक रंगभूमीवर आलं. पहिल्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्यानंतर दोन महिने हे नाटक कोणतीही संस्था घेण्यासाठी उत्सुक नव्हतं. नाटक बंद केलं तर या मुलांच्या प्रयत्नांवर विरजण पडेल, असं निर्मात्या रश्मी मांढरे आणि वीणा ढोले यांना वाटलं आणि त्यांनी स्वखर्चाने नाटक करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तेवढासा सोपा नव्हता. कारण नाटकात १९ पात्रं, त्याचबरोबर मेघदूतसारखी संहिता असेल तर वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना, नेपथ्य हे सारे त्या काळातले असायला हवे. त्यामुळे नाटकाचा खर्च वाढला आणि एका प्रयोगाला साधारण एक लाख रुपये खर्च अपेक्षित होता. पण निर्मात्यांनी प्रयोग करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी तीन प्रयोग केले, या तिन्ही प्रयोगांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण ज्या मोजक्या लोकांनी हे तीन प्रयोग पाहिले होते त्यांनी ते अन्य लोकांना बघायला सांगितले आणि गर्दी वाढत गेली. पंढरपुरात झालेल्या प्रयोगाला तब्बल ९०० लोकांनी उपस्थिती लावली. नाइलाजास्तव बऱ्याच लोकांना तिकिटं देता आली नाहीत. सध्याच्या घडीला या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकातून नफा मिळवण्याचा उद्देश नाही. कारण या नाटकाचा नफा अन्य सामाजिक कामांसाठीही वापरला जातो. आणि याचा आनंद या अंध विद्यार्थ्यांना सर्वाधिक आहे. आपल्याला लोक मदत करतात, पण आपण कुण्याच्या तरी उपयोगी पडू शकतो, ही भावना त्यांना स्वर्गीय आनंद देऊन जाते.
आत्ताची युवा पिढी किरकोळ गोष्टींवरून आत्महत्येपर्यंतचा टोकाचा निर्णय घेते. सारं काही त्यांच्याकडे असतं, अगदी धडधाकड असतात, पण तरी अतिरिक्त दडपणाचा बाऊ करतात. पण हे नाटक त्यांच्यासाठी सकारात्मक ऊर्जा देऊन जातं. काहीतरी नवीन करण्याची उमेद देतं, प्रेरणा देतं, बऱ्याच युवांनी हे मनोगत नाटकानंतर या अपूर्व मेघदूतच्या टीमपुढे व्यक्त केलं आहे. नाटकादरम्यान प्रत्येकाला एक पोस्टकार्ड दिलं जातं आणि त्यावर आपलं मनोगत तुम्ही नोंदवायचं असतं. आतापर्यंत असंख्य पत्रं थोरात सरांना आली आहेत. ज्यामध्ये बऱ्याच जणांनी आम्हाला जगण्याची दिशा मिळाल्याचं सांगितलं आहे.
व्यावहारिक गणितं मांडत बसलो तर सामाजिक काम होऊच शकत नाही. त्यामुळे आम्ही हे नाटक करताना आर्थिक फायद्याचा विचार केला नाही. अंध मुलांना संधी द्यायची, पाठिंबा द्यायचा आणि मेघदूतसारखं नाटकं ही मुलं करू शकतात, हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं, तेच आम्ही पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने केलं, असं निर्मात्या रश्मी सांगून जातात.
थोरात सरांची तर बातच न्यारी. अंध मुलांना शिकवता यावं, यासाठी प्रथम ते घरात डोळ्यावर पट्टी बांधून वावरले. काहीच दिसत नसताना काय समस्या येतात आणि त्या कशा सोडवायच्या हे ते स्वत:पासून शिकले. ‘तीन पैशांचा तमाशा’ हे अंधांचं पहिलं व्यावसायिक नाटक बसवण्याचा मानही त्यांनी पटकावला. सध्याच्या घडीला ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ या नावाने ते सर्वपरिचित आहेत.
मी चित्रकार असल्यामुळे मला नाटक पहिल्यांदा कसं होईल ते दिसतं आणि त्यानंतरच मी ते करायला घेतो. पण उपेक्षितांची कलाकृती उपेक्षितच राहते, असं मला वाटायचं आणि तेच खरं आहे. हे नाटक पुरस्कारांच्या पुढचं नाटक आहे. फक्त मनोरंजन नाही तर आयुष्याला सकारात्मक ऊर्जा देणारं, जीवन किती सुंदर आहे हे शिकवणारं हे नाटक आहे. हे नाटक पाहायला या, जर पाहिलं नाहीत तर आयुष्यातल्या आनंदला मुकावं लागेल. हे माझं नाटक आहे, म्हणून मी म्हणत नाही, तर हा एक चांगला उपक्रम आहे. या नाटकाने जगायची प्रेरणा मिळेल आणि सकारात्मक ऊर्जेने आनंदही, असं थोरात सर म्हणत होते.
या नाटकाचं नाव अपूर्व मेघदूत का? असा प्रश्नही काही जणांना पडला असेल. तर.. कालिदासांनी आतापर्यंत नऊ कलाकृती लिहिल्या. ज्यामधील आठ त्यांच्या हयातीत सादर झाल्या, त्या साऱ्यांमध्ये राजांची चरित्रं होती. पण हे नाटक कुठेतरी कालिदासाच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित असल्याचं लेखक गणेश दिघे यांना वाटलं. कालिदास मेघदूतमध्ये भावनिकरीत्या गुंतलेले वाटतात. मग ही त्यांची प्रेमकथा असेल का? हा विचार करत नाटकाला कालिदास यांच्या वैयक्तिक आयुष्याची जोड दिली आणि ‘अपूर्व मेघदूत’ हे नाटक गणेश सरांनी लिहिलं.
गणेश सर हे कालिदासांच्या कलाकृतींचे अभ्यासक आहेत. यापूर्वी त्यांनी मेघदूत, शाकुंतल, मी कालिदास, रघुवंश पर्व आणि यक्षिणी विलाप यांसारखी कालिदासांच्या साहित्यावर आधारित नाटकं केली आहेत. पण मेघदूतसारखे नाटक अंध विद्यार्थ्यांसाठी करणे म्हणजे आव्हानच. पण ही संहिता लिहिताना त्यांमध्ये कोणतेही बदल दिघे यांना करावे लागले नाहीत.
हे नाटक अंध विद्यार्थी करत असले तरी संहितेमध्ये कोणताही बदल मला करावा लागला नाही. मेघदूतसारखं नाटक हे विद्यार्थी पेलवू शकतील का, अशी साशंकता मनात होती. कारण कालिदासाचं मेघदूत उभं करणं, ही सोपी गोष्ट नाही. स्वागत सरांना मी तसे सांगितलंही. त्यांनी मला आश्वासन दिलं की नाटक चांगलं होऊ शकेल. पण पहिला प्रयोग सादर होईपर्यंत मनात शंका होती. मी जेव्हा पहिला प्रयोग पाहिला, त्या वेळी मला वाटलं, की ही मुलं खरंच अंध आहेत का? मी चक्रावूनच गेलो. हा प्रयोग एनएसडीच्या मुलांनी केला तसाच या मुलांनी पूर्ण ताकदीनिशी केला, गुणात्मक कमतरता मला कुठेही जाणवली नाही, असं गणेश सर सांगत होते.
अंध विद्यार्थ्यांनी सादर केलेलं जगायला दिशा देणारं नाटक, असा उल्लेख आपण निश्चितच अपूर्व मेघदूतच्या बाबतीत करू शकतो. हे फक्त एक नाटक नाही, तर जगण्याची उमेद वाढवण्याचा एक प्रयोग आहे. या अंध मुलांना या नाटकाने बरंच काही दिलं, पण भरपूर काही बाकी आहे. त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात तजेलदारपणा देणारं, बरंच काही शिकवणारं, न्यूनगंडाला तिलांजली देणारं आणि आपण काय आहोत व काय करू शकतो, हे सांगणाऱ्या या मेघदूत नाटकाची अपूर्वाई पाहायलाच हवी.