अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आभिनेत्री तारा सुतारिया यांचे ‘मसक्कली २.०’ हे गाणं सध्या जोरदार चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे गाणं ‘दिल्ली ६’ या चित्रपटातील ‘मसक्कली’ या गाण्याचा रिमेक आहे. त्यामुळे संगीतकार ए. आर. रेहमान या गाण्यावर संतापले आहेत.

काय म्हणाले ए. आर. रेहमान?

“मसक्कली हे गाणं तयार करण्यासाठी आम्ही कुठलाही शॉटकर्ट घेतला नाही. कित्येक रात्र विचार करुन २०० पेक्षा अधिक संगीतकारकांशी चर्चा करुन या गाण्याची निर्मिती केली आहे. तब्बल ३६५ दिवस आम्ही या गाण्यावर काम करुन एका अजरामर गाण्याची निर्मिती आम्ही केली होती. त्यामुळे ओरिज्नल गाण्याचाच आनंद घ्या.” अशा आशयाचं ट्विट करुन ए. आर. रेहमान यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

‘दिल्ली ६’ हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘मसक्कली’ हे गाणं सुपहिट ठरले होते. या गाण्याची निर्मिती ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रेहमान यांनी केले होते. तसेच गाण्याचे बोल प्रसून जोशी यांनी लिहिले होते. या गाण्याच्या रिमेक वर्जनमुळे काही रसिक नाराज आहेत. ए. आर. रेहमान यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.