‘ऑस्कर’ हा सिनेक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जातो. वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सिनेक्षेत्रावर लिहिणारी नियतकालिके आणि जगभरातील चित्रपटवेडी प्रेक्षकमंडळी जवळ जवळ संपूर्ण जगच या पुरस्कारांकडे लक्ष ठेऊन असतात. जगातील मोजकेच कलाकार ऑस्करच्या नामांकन यादीपर्यंत पोहचात. आणि उर्वरीत मंडळी केवळ टाळ्या वाजवून पुरस्कार पटकावणाऱ्यांच्या आनंदात आपला आनंद मानतात. परंतु भारतासाठी हा करिश्मा ए. आर. रेहमान यांनी करुन दाखवला.

आपल्या अफलातून संगीताच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार, गायक ए. आर. रेहमान यांनी २००९ साली थेट ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले. भारत हा संगीत प्रधान चित्रपटांसाठी ओळखला जातो. म्हणजे आपल्या देशात प्रदर्शित होणाऱ्या जवळपास प्रत्येक चित्रपटात चांगले कथानक असो वा नसो गाणी तर असावीच लागतात. परंतु आपल्या चित्रपटांमधील गाण्यांची ऑस्कर पर्यंत मजल कधी गेलेलीच नाही. परंतु ए. आर. रेहमान यांनी ही परंपरा मोडीत काढली. त्यांनी त्यांच्या गाण्यांची नोंद पाश्चात्य प्रेक्षकांनाही घेण्यास भाग पाडले.

गेल्या ९० वर्षात ऑस्कर पुरस्कार पटकावणारे ते भारतील पहिले आणि सध्याचे एकमेव संगीतकार आहेत. आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे जिथे भारतीय कलाकार केवळ नामांकन मिळवण्याची स्वप्ने पाहातात तर दुसरीकडे रेहमान यांनी एका वर्षात तब्बल दोन ऑस्कर पुरस्कारांवर आपले नाव कोरले.

२००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. तसेच चित्रपटातील बॅकराऊंड स्कोअरसाठी देखील त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित केले गेले. रेहमान यांनी त्यानंतर अनेक चांगल्या गाण्यांची निर्मिती केली. २०११ साली त्यांना ‘इफ आय राईस’ व ‘आर्स’ या दोन गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट गाणे या विभागात ऑस्कर नामांकन मिळाले होते.