बॉलिवूडची बहुचर्चित जोडी सलमान खान आणि कतरिना कैफ पाच वर्षांनंतर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटासाठी दबंग खान आणि कतरिनाचे चाहते उत्सुक असतीलच. कारण सलमान आणि कॅटची जबरदस्त केमिस्ट्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यातील पहिले गाणे ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले.
या गाण्याचे चित्रीकरण ग्रीसमध्ये झाले. गाण्याच्या पोस्टरमध्ये सलमान आणि कॅट ‘मिलिटरी ग्रीन’ रंगाच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच ट्रेलर प्रदर्शित झालेला. पण त्यामध्ये हे दोघे कमी वेळासाठीच एकत्र दिसले. या गाण्यामध्ये मात्र, सलमान- कॅटची पुरेपूर झलक पाहायला मिळणार आहे. विशाल- शेखर या जोडीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
Get ready to groove #SwagSeKarengeSabkaSwagat coming soon @TigerZindaHai @yrf @VishalDadlani @ShekharRavjiani @Irshad_Kamil , Greece pic.twitter.com/UCLXyHxajk
— ali abbas zafar (@aliabbaszafar) November 15, 2017
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा ‘टायगर जिंदा है’ हा सिक्वल आहे. ‘एक था टायगर’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यावेळी ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता ‘टायगर जिंदा है’च्या ट्रेलरलासुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या २४ तासांमध्ये या ट्रेलरला तब्बल २ कोटी ९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचेसुद्धा रेकॉर्ड मोडणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे.