बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चिली जाणारी जोडी म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलेल्या या जोडीने त्यांचं नातं सर्वांसमक्ष मान्य केलं आहे. त्यामुळे आता हे दोघं बऱ्याच वेळा एकत्र फिरताना दिसतात. सध्या मलायका आणि अर्जुन व्हेकेशनवर असून अर्जुन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे काही फोटो शेअर करत आहे. त्यातच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असाच एक फोटो शेअर करत ‘दो दिल मिल रहें हैं मगर..’असं कॅप्शन देत मलायकावरील प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

अर्जुनने हार्ट शेपमधील दोन फुग्यांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘दो दिल मिल रहे हैं मगर…’। असं कॅप्शन दिलं आहे. हे गाणं लोकप्रिय चित्रपट ‘परदेस’ या चित्रपटामधील असून अभिनेता शाहरुख खान आणि महिमा चौधरीवर चित्रीत करण्यात आलं आहे. तर कुमार सानू यांचा स्वरसाज या गाण्याला चढला आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याची माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे. त्यामुळे यांच्या चाहत्यांचे लक्ष आता त्यांच्या लग्नाकडे लागले आहेत. सध्या अर्जुन त्याच्या आगामी ‘पानिपत’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.