विजय देवरकोंडा हे नाव दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झालं आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर विजय प्रकाशझोतात आला. विजयने नुकताच त्याचा ३०वा वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना खास भेट दिली.

विजयने आपल्या चाहत्यांसाठी नऊ ट्रक भरून आइस्क्रीम वाटले. हे आइस्क्रीम एक, दोन नव्हे तर तब्बल हैदराबाद, विजयवाडा, तिरुपती, बंगळुरू, चैन्नई आणि कोची या पाच राज्यांमध्ये वाटण्यात आले. विजयने हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात स्वतः जाऊन चाहत्यांना आइस्क्रीम वाटले. विशेष म्हणजे त्याने गेल्या वर्षीही सुमारे ४ ते ५ हजार आइस्क्रीम वाटले होते.

यंदा ‘फोर्ब्स’ने जारी केलेल्या ३० वर्षांहून कमी वयाच्या श्रीमंत कलाकारांमध्ये विजय देवरकोंडाचं नाव आहे. विजयने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, जेव्हा तो २५ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बँक अकाऊंटमध्ये ५०० रुपयांपेक्षाही कमी रक्कम होती. त्यामुळे बँकेनं त्याचं अकाऊंट लॉक केलं होतं आणि आता ‘फोर्ब्स इंडिया’च्या ३० वर्षांहून कमी वयाच्या श्रीमंत कलाकारांमध्ये माझं नाव आहे.

गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.