आजचा प्रेक्षक हा प्रगल्भ आहे. त्याला वास्तवाचे भान आहे, त्यामुळे प्रेक्षकाला तेच वास्तव पाहणे अधिक आवडते. या छोटय़ा मात्र महत्त्वाच्या मुद्दय़ाला धरून सुरुवात केलेल्या ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘बन मस्का’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ‘मैत्रेयी’ आणि ‘सौमित्र’ या दोन पात्रांच्या मैत्रीपासून सुरू झालेल्या या मालिकेने अवघ्या दहा महिन्यांत प्रेक्षकांना आपलेसे केले. सध्याच्या रटाळ मालिकांना छेद देणारे संवाद, विषयाची मांडणी आणि सहजता ‘बन मस्का’च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.

‘पोतडी एंटरटेनमेंट’ या नव्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शक विनोद लव्हेकर, निखिल शेठ आणि अभिनेता, दिग्दर्शक संदेश कुलकर्णी या तिकडीने आणलेले ‘बन मस्का’ हे पहिले पुष्प. यापूर्वीही या तिघांनी थिएटरमध्ये नवनवे प्रयोग करून प्रेक्षकांना अचंबित केले आहे. त्यामुळे मालिका करतानाही तोचतोचपणा आणण्यापेक्षा काहीतरी नवे करावे असा या तिघांचा प्रयत्न होता. त्यातून गप्पांच्या ओघातच मालिकेचा विषय ठरला आणि त्याची कथाही तयार झाली, असे संदेश कुलकर्णी यांनी सांगितले. साधारणपणे मालिका या टीआरपीनुसार ठरविल्या जातात. प्रेक्षकांना काय आवडते यानुसार मालिकांचे कथानक वाढविले जाते. मात्र या तुलनेत ‘बन मस्का’ हा प्रयोग नवा ठरतो. ‘बन मस्का’ सुरू होण्यापूर्वीच त्याचे दहा महिन्यांचे संपूर्ण कथानक तयार होते. या मालिकेतील संवाद लिहिण्याची जबाबदारी विनोद लव्हेकर, मनस्विनी लता रवींद्र, संदेश कुलकर्णी यांच्याकडे होती. या संवादातही मालिकेतील पात्रांच्या गरजेप्रमाणे खुसखुशीतपणा आणण्यात आला.

Neet action against Subodh Kumar Singh after NET paper leak
‘एनटीए’प्रमुखांची उचलबांगडी; नीट, नेट पेपरफुटीनंतर सुबोध कुमार सिंह यांच्यावर कारवाई
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा
kannada actor darshan arrested in murder case
कन्नड अभिनेता दर्शनला हत्येप्रकरणी अटक; बंगळूरु पोलिसांच्या कारवाईनंतर सहा दिवसांची पोलीस कोठडी
Mahadev Jankar viral video
महादेव जानकरांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट, पण त्यांच्या ‘या’ कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही लोटपोट हसाल!
Kangana Ranuat
कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी बहीण…”
It became clear that the BJP would stay away from its 400 par claim and after that the social media was hit with MIMs
‘मिमकरां’च्या प्रतिभेला धार..
Son Surprised Father With PSI Result on call emotional video goes viral
“हॅलो बाबा पीएसआय गोकुळ देशमुख बोलतोय” निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा वडिलांना केला फोन; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

मालिकेचे कथानक पूर्ण झाल्यानंतर पात्रांचा शोध घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही विनोद लव्हेकर यांची होती. त्यानुसार त्या ताकदीचे कलाकार असणे ही गरज होती. म्हणून पुण्यातील ‘पुरुषोत्तम करंडक’ या नामांकित स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांची आणि अशाच स्पर्धामधून चांगला अभिनय केलेल्या कलाकारांना निवडून त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यातूनच शिवानी रंगोले, शिवराज वायचल, रुचा आपटे, रोहन गुजर यांसारख्या ताकदीच्या कलाकारांची एक टीम तयार झाली आणि सुरुवात झाली एका अनोख्या प्रयोगाला.

‘बन मस्का’ ही कथा पुण्यात राहणाऱ्या मित्रमैत्रिणींची आहे. सौमित्र आणि मैत्रेयी यांच्या प्रेमकथेवर ही मालिका बेतलेली असली, तरी त्यांची मित्रमंडळी, त्यांचे आई-वडील, मैत्रेयीची आजी या सगळ्यांना या मालिकेत तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. उगाच इफेक्टची नाटय़मयता निर्माण करून, सासू-सुनांमधली भांडणं दाखवून, घराबाहेरची लफडी दाखवून टीआरपी नामक यशाचं गमक साधणाऱ्या सध्याच्या सगळ्याच मालिकांना ‘बन मस्का’ हे उत्तर आहे. यातील सौमित्र हा होमिओपथी डॉक्टर आहे, अ‍ॅलोपथीचा प्रवेश नाकारून ‘माणसांचा’ डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न आहे. त्याची प्रेयसी असलेली मैत्रेयी ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. ती कार्टून्सना आवाज देण्याचं काम करते. नव्या पिढीच्या करिअरची वेगळी निवड हे यातलं वैशिष्टय़. या दोघांसोबत त्यांचा ग्रुप आहे, त्यात पुणेरी शुद्ध भाषेत बोलणारा ‘चुंबक’ आहे, त्याची प्रेयसी ‘रुतू’ जी सीए आहे. या ग्रुपमध्ये ऐश्वर्या नावाची एक भोळसट कन्याही आहे, जी केवळ सोशल मीडियावर राहून एका अभिनेत्याच्या प्रेमात पडते, केवळ पडतेच असं नाही तर त्याला त्याचा त्रास होईपर्यंत त्याचा पिच्छा पुरवते. त्याशिवाय गॅरेजमध्ये काम करणारा रोकडय़ा आहे, ज्याचे कालांतराने लग्न होते. कर्णबधिर असलेला आदिल आणि त्याची बोलकी प्रेयसीही आहे. ज्योती सुभाष यांनी नव्या पिढीच्या आजीची भूमिका साकारली जी आपल्या नातीला संस्कृती आणि समाजाच्या गराडय़ात न अडकवता खुलेपणाने विचार करण्यास प्रोत्साहन देते. त्यामुळे आपल्यालाही अशीच आजी असावी असा विचार आपल्या मनात डोकावून जातो. सौमित्रच्या कुटुंबातील त्याचे साधे-भोळे आई-बाबा आणि नावाप्रमाणेच खुळचट विघ्नेशही आहे. या सगळ्याच मंडळींनी त्यांच्या वेगळेपणामुळे गेल्या दहा महिन्यांत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

उगाचच मोठमोठे वाडे नाहीत, घरात काम करतानाही शाही साडय़ा आणि कपडे परिधान केलेले आणि भरीव मेकअप केलेले स्त्री-पुरुष नाहीत. अगदी तुमच्या, आमच्या घरात जसं घडतं, तसं या मालिके त घडत राहतं. या मालिकेत घरातली माणसं खाली जेवायला बसतात, याचेच विशेष कौतुक वाटलं. एकीकडे कुटुंबव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडून पडत असताना, सोशल मिडीयावरचा संवाद हीच मैत्री असा नवा गैरसमज दृढ होत असताना, या मालिके तील मित्र-मैत्रिणींचं बॉण्डिंग हे नव्या पिढीला एक नवा विचार देणारं ठरलं. आजच्या तरुण मुलांमध्ये असणारे सोशल मिडीया, अफेअर्स, ड्रिंक्स हे सगळे विषय यात आहेत, त्याचबरोबर करिअरची स्पर्धाही आहे, पण ज्या समरसतेने मालिकेची मांडणी केली आहे, त्यामुळे हे सगळे विषय असूनही त्याचा दर्जा खाली जात नाही.

या मालिकांमधील संवाद ही त्याची जमेची बाजू ठरली. विनोदाचा दर्जा उंचावणारे संवाद ऐकताना तुम्हाला हसू आवरत नाही. त्यात एकापेक्षा एक सरस कलाकारांनी गुंफलेली ही मालिका जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.  दूरचित्रवाहिनीचं जग जितकं झपाटय़ानं वाढतंय, त्याच वेगानं त्यावर दाखविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या दर्जाची घसरण सुरू आहे. हजारोच्या संख्येत विविध मनोरंजन वाहिन्यांचे पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध असतानाही दर्जेदार असं काही पहायला मिळेलच याची शाश्वती नाही. अनेकदा तर केवळ सर्फिंग हाच पर्याय प्रेक्षकांच्या हातात उरतो. सगळ्या वाहिन्यांवर त्याच त्या पठडीतल्या डेली सोपचा रतीब हा तर निर्माता, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांच्या प्रगल्भतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. अशातच काही मोजक्या मालिका असतात की ज्या तुम्हाला खरोखरच निखळ आनंद देतात. आणि या मालिकाच नव्हेत तर त्यातील विषय, पात्र, त्यांची मांडणी ही तुमच्या दीर्घकालीन लक्षात राहते. ‘झी युवा’ या तरुण, नव्या वाहिनीवरील ‘बन मस्का’ नावाची मालिका ही त्यापैकीच एक..

ता.क.

‘पोतडी एंटरटेनमेट’ लवकरच ‘झी युवा’ वाहिनीवर नवीन थ्रिलर मालिका घेऊन येत आहे. तरुण पिढीला लहान कथा अधिक रंजक वाटतात. त्यामुळे या मालिकेत तीन महिन्यांचे एक कथानक असणार आहे, असे संदेश कुलकर्णी यांनी सांगितले.