एकांकिका महत्त्वाची असली तरी पात्रांशिवाय जिवंतपणा येत नाही. एखादे पात्र किंवा भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहते. विचार करायला उद्युक्त करते. लोकांकिका स्पर्धेत कलाकार म्हणून अव्वल ठरण्यासाठी सध्या भूमिकेचा, विषयाचा कसून अभ्यास सुरू आहे. त्यानिमित्ताने वाचन, निरीक्षणे सुरू आहेत. एकांकिकेतील मुख्य पात्रांवर सादरीकरण बेतलेले असल्याने तरुण कलाकार लोकांकिका स्पर्धेसाठी कसे प्रयत्न करत आहेत याविषयी घेतलेला आढावा..

‘आपकी फर्माइश’ पूर्ण करण्याचा प्रयत्न’

It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी होण्याचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही व्हॉट्सअप सादर करून थेट मुंबई गाठली होती. हा अनुभव अविस्मरणीय ठरला. वेगळे काहीतरी शिकायला मिळाले. याच अनुभवाच्या आधारे यंदाही स्पर्धेवर यशाची मोहोर उमटविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यावर्षी ‘आपकी फर्माइश’ या एकांकिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लहान लहान इच्छा पूर्ण करण्यासाठी कशी धडपड करावी लागते, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. या एकांकिकेत दिग्दर्शनाबरोबर राजाभाऊ  नावाचे पात्र साकारतो आहे. समाजातील अद्ययावत घडामोडींचे ज्ञान नसले तरी आजूबाजूच्या लोकांना उपदेशाचे डोस पाजायला तो सदा तयार असतो. राजाभाऊ ला गावाची निवडणूक लढवायची असते. त्यामुळे तो आणि त्याचा सहकारी गावातील प्रत्येक समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. हे काम करत असताना स्वार्थ कसा साधता येईल, यासाठीही तो प्रयत्न करतो. हे पात्र ग्रामीण विनोदी ढंगाचे आहे. यासाठी गावात जाऊ न तेथील माणसे कशी वागतात, याचा अभ्यास करतो आहे. याशिवाय सभोवताली वावरणाऱ्या व्यक्तींच्या बोलीभाषेचाही अभ्यास करत असून समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ग्रामीण भागातील वेगवेगळ्या चित्रफिती पाहतो आहे. दिग्दर्शक म्हणून स्पर्धेवर छाप सोडण्यासाठी नाटकाचा विषय, नेपथ्य, संगीत, त्या त्या पात्राची भाषेवरील हुकमत यासह अन्य तांत्रिक मुद्दय़ांवरही काम सुरू आहे. चुका टाळण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळते आहे. विभागात तसेच राज्यस्तरीय फेरीत धडक देण्यासाठी आम्ही नेटाने प्रयत्न करीत आहोत.

– सूरज बोढाई, के.टी.एच.एम महाविद्यालय, नाशिक

‘भूमिका जगतेय..’

आमचे धनवटे नॅशनल महाविद्यालय दरवर्षी लोकांकिकेत सहभागी होते. गेल्यावर्षी महाविद्यालयाने अंतिम फेरी गाठली. यावर्षी वीरेंद्र गणवीर लिखित ‘गटार‘ एकांकिका सादर करणार आहोत. मला गटार साफ करणाऱ्याच्या पत्नीची भूमिका करायची आहे. गटार साफ करणाऱ्या किंवा रस्ता झाडणाऱ्या व्यक्तींना समाजाकडून तुच्छ वागणूक मिळते. त्यांना कमी लेखले जाते. त्यांना मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी करावी लागणारी तारेवरची कसरत आणि त्यांचे तुटपुंजा मिळकतील जगणे हे एकांकिकेत मांडले आहे. ही भूमिका सतत माझ्या डोक्यात असते. त्यासाठी आवर्जून त्या लोकांमध्ये जाणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे, त्यांच्यासारखे बसणे, उठणे, बोलणे, त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करणे याची तयारी सध्या सुरु आहे. आमच्या कॉलनीत  गटार साफ करणारे मजूर येत असतात. त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाते. त्यांच्याकडून त्यांचे रोजच्या जगण्याचे अनुभव जाणून घेत आहे.

प्रियंका तायडे, धनवटे नॅशनल महाविद्यालय — नागपूर</p>

‘निरीक्षण महत्वाचे’

‘ती पहाट केव्हा येईल’ या एकांकिकेमध्ये मी एका ५०-६० वर्षांच्या आजीबाईंची भूमिका साकारते आहे. सुरुवातीला आमच्या महाविद्यालयातर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तिथे आम्हाला अभिनयाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आम्हाला एक विषय देऊ न त्यावर सादरीकरण करण्यास सांगितले होते. त्यातून माझी या भूमिकेसाठी निवड झाली. नाटकात काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आमच्या टीममधील काही अनुभवी कलाकार आणि आमचे दिग्दर्शक मला अभिनय आणि संवादकौशल्य याविषयी योग्य मार्गदर्शन करत असतात. मी यूटय़ूबवर काही व्हिडीओ पाहते आहे. त्यातील वृद्ध महिलांचे वागणे-बोलणे कशा प्रकारचे आहे याचे निरीक्षण करते. त्यांच्या बोलण्याच्या लकबी आत्मसात करते. त्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे चढउतार येत असतात, त्याचा त्या महिलांवर कसा परिणाम होतो याविषयी विचार करते. याशिवाय माझ्या आजीचे वयसुद्धा साधारण माझ्या भूमिकेएवढेच आहे. मी तिचेही निरीक्षण करते. सुरुवातीला आमची तालीम दुपारी १२ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालायची. पण आता जसजसा स्पर्धेचा दिवस जवळ येतोय तशी तालमीची वेळही वाढते आहे. आम्ही सकाळपासूनच तालीम सुरू करतो. महाविद्यालयातील पहिल्याच वर्षी इतकी छान भूमिका करायला मिळत असल्याने मी खूश आहे. आता फक्त स्पर्धेच्या दिवसाची वाट पाहते आहे. प्राथमिक फेरी जिंकून प्रत्यक्ष रंगमंचावर काम करण्यासाठी उत्सुक आहे.

– वृषाली वाळुंज, कीर्ती महाविद्यालय, मुंबई.

‘अनुभवाचा उपयोग होईल’

यंदा ‘चौकट’ ही एकांकिका सादर करतो आहोत. ही एकांकिका आरक्षणावर आधारित असल्याने त्यासाठी इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच कुठल्या शब्दावर किती वजन द्यावे, कुठल्या शब्दासाठी आवाजाची पातळी वाढवावी हीच खरी कसरत आहे. त्यामुळे काळजीपूर्वक तयारी सुरू असून एकांकिकेचे वाचन अधिक केले जात आहे. आयएनटी आणि युथ फेस्टिव्हलनंतर दर्जेदार आंतर महाविद्यालयीन स्पर्धा म्हणून लोकांकिका स्पर्धेकडे पाहिले जात आहे. मुळातच संपूर्ण महाराष्ट्राची महाअंतिम फेरी या एकांकिकेत पाहायला मिळते. त्यामुळे इतर ठिकाणी देखील विषयांची मांडणी कशी होते, सादरीकरण कसे होते हे पाहण्यासाठी तितकीच उत्सुकता असते. सध्या विभागीय फेरीची तयारी सुरू असून आपला प्रयोग उत्तम करण्याकडे अधिक कल आहे. प्रयोग उत्तम झाल्यावर आपोआपच उपांत्य फे रीत निवड होईल याची खात्री आहे. गाठीशी असणारा तीन वर्षांचा अनुभव आणि अधिकाधिक मेहनत घेणे हेच महत्त्वाचे वाटते. लोकांकिकेचे परीक्षक उत्तम असल्याने दरवर्षी मार्गदर्शनही चांगले मिळते. यामुळे मागील वर्षी झालेल्या चुका पुढील वर्षी टाळता येतात.

-अजय पाटील, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे.

भाषा महत्वाची..

व्हीएमव्ही महाविद्यालयही लोकांकिका स्पर्धेत सहभागी झाले आहे. संहिता लिहून झाली असून ते प्रत्यक्ष तालमीला सुरुवात झाली आहे. नाटय़ आणि अभिनयाशी संबंधित अभ्यासक्रम आमच्या महाविद्यालयात असून या अभ्यासक्रमाचे आम्ही विद्यार्थी लोकांकिकेत उतरले आहोत. अभिनय करताना वाटय़ाला आलेली भूमिका जगण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यासाठी आधी त्या भूमिकेचा अभ्यास करण्यावर, त्याच्या निरीक्षणांवर भर देतो. भाषा हा भाग फारच महत्त्वाचा असून ऐंशी टक्के भाषा, वीस टक्के भावना आणि अभिनय ‘पात्रात‘ टाकून भूमिका वठवण्याचा प्रयत्न मी करतो आहे.

शंतनू सोनी, व्हीएमव्ही महाविद्यालय, नागपूर

(संकलन – चारुलता कुलकर्णी, ज्योती तिरपुडे, भाग्यश्री प्रधान, नमिता धुरी.)