एरवी फार कुठे व्यक्त न होणारा, समाजमाध्यमांवर आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कोत असला तरी सतत प्रकाशझोतात राहणं टाळणारा सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या चित्रपटाबाबत अडचण आली तेव्हा जाहीरपणे व्यक्त झाला. ‘अय्यारी’ हा त्याचा नवा चित्रपट २६ जानेवारीपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. पण सतत येणाऱ्या तारखा आणि अन्य चित्रपटांच्या घोळामुळे नीरज पांडे दिग्दर्शित हा चित्रपट पुढे पुढे करत या आठवडय़ात १६ फेब्रुवारीवर येऊन स्थिरावला आहे. कित्येक दिवस-महिने आधी तारीख जाहीर करून आणि चित्रपटाची ठिकठिकाणी प्रसिद्धी करून केवळ प्रदर्शनासाठी वाट पाहणाऱ्या चित्रपटाच्या कलाकारांसाठी हा अनुभव त्रासदायक होता. जो सिद्धार्थच्या पोस्टवरून जाहीरही झाला.. गेल्या दहा चित्रपटांमधून शिकत शिकत आपण या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. अभिनयातलं शहाणपण आता आलंय, त्याच्या वापराने पुढची वाटचाल करण्यासाठी आपण तयार आहोत, असं सिद्धार्थ म्हणतो.

करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटातून २०१२ मध्ये अभिनेता म्हणून त्याने श्रीगणेशा केला असला तरी बॉलीवूडमध्ये तो त्याआधीच दाखल झाला होता. दिल्लीतून आलेल्या सिद्धार्थने २०१० पासून करण जोहरकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं होतं. मात्र धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखालीच त्याचा अभिनेता म्हणून वेगळा प्रवास सुरू झाला. गेल्या सहा वर्षांत त्याने दहा चित्रपट केले आहेत. यातल्या सुपरहिट चित्रपटांची संख्या तुलनेने कमी असली तरी त्याने हरएक चित्रपटात वेगळं काही करून पाहण्याचा प्रयत्न केला हेही तितकंच खरं आहे. मागे वळून पाहिल्यावर गेल्या दहा चित्रपटांमधून मी बरंच काही शिकलो आहे. एक अभिनेता म्हणून माझी प्रगती नक्कीच झाली आहे, असं तो सांगतो. इतक्या चित्रपटांमधून आपला अभिनय आणि वाटय़ाला आलेली भूमिका यातून नेमकं प्रेक्षकांना काय द्यायचं आहे याबद्दलची जाण माझ्यात आली आहे. माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाचा माझा उत्साह, आत्मविश्वास आणि आता मनात निर्माण होणारी भावना यात खूप अंतर आहे. आता या क्षणाला कुठल्याही छटा साकारण्यासाठी मी तयार आहे आणि हे मी माझ्या आजवरच्या आयुष्यातील अनुभवांतूनच शिकलो आहे, असं तो तितक्याच ठामपणे सांगतो.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

बॉलीवूडचा हिरो म्हटलं की त्याला अ‍ॅक्शन आणि नाचगाणं या गोष्टी आल्याच पाहिजेत. सिद्धार्थच्या बाबतीत नाचणं आणि त्यासाठी गाण्यावर ओठांची हालचाल करत डबिंग करणं हा प्रकार आपल्याला अजिबात आवडत नव्हता, असं तो म्हणतो. पण आता तो याही कलेत चांगलाच निपुण झाला असल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्या तुलनेने अ‍ॅक्शन त्याला जास्त जवळची वाटते. मात्र त्यातही आपण बरीच सुधारणा केली आहे, असं तो सांगतो. ‘एक व्हिलन’ ते ‘अ जंटलमन’ इथपर्यंतच्या प्रवासात चित्रपटागणिक अ‍ॅक्शनचं स्वरूप इतकं वैविध्यपूर्ण होतं की तेही आपण शिकून घेतलं असल्याने आता त्यातही वैविध्य दाखवण्याइतपत समृद्धता आली असल्याचं तो स्पष्ट करतो. नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ चित्रपटात सिद्धार्थने पहिल्यांदाच मनोज वाजपेयीसारख्या कसदार अभिनेत्याबरोबर काम केलं आहे. मनोज वाजपेयी हे अभिनेता म्हणून सूक्ष्मात जाऊन काम करणारा कलाकार आहे, चित्रीकरणादरम्यानच्या रिकाम्या वेळात त्यांना अभिनयातील काही बारकावे समजावून देण्याविषयी त्यांना मी विनंती केली होती. त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता हसत हसत आपल्या अनुभवांची शिदोरी माझ्यासमोर खुली केली, असं म्हणणारा सिद्धार्थ म्हणूनच मनोजसारख्या कलाकारांना दिग्गज मानतो. या चित्रपटात तर त्या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. मी या चित्रपटात मेजर जय बक्क्षीची भूमिका केली आहे. जय हा कर्नल अभय सिंग म्हणजेच मनोज वाजपेयींच्याच हाताखाली प्रशिक्षण घेऊन तयार झालेला सैन्यदलाचा अधिकारी आहे. त्यामुळे एका वळणावर जेव्हा जय सैन्यदलाच्या विरोधात जातो तेव्हा एके काळचे गुरू -शिष्य एकमेकांचे शत्रू बनून एकमेकांसमोर उभे ठाकतात. दोघांनाही एकमेकांचे गुण-दोष अवगत आहेत. अशा वेळी एकमेकांना शह देताना ते किती हुशारीने वागतील हा सामना कथेतही तितक्याच जोरदारपणे येतो आणि अर्थातच मनोज वाजपेयीसारख्या कलाकाराबरोबरची ही जुगलबंदीच चित्रपटाचा जीव आहे, असं सिद्धार्थने सांगितलं.

आत्तापर्यंतच्या अभिनय प्रवासात काम करत, शिकत पुढे जाण्यावरच आपला भर होता. मी गेली कित्येक वर्ष मुंबईत राहतोय, इथं मी आयुष्य अनुभवलंय आणि तो अनुभवच आपल्याला बरंच काही शिकवून जातो. पडद्यावर वेगवेगळ्या मानवी भावभावना रंगवण्याचं बळ हे या अनुभवांतूनच मिळतं. मी जितकं काम करतो तितकंच नवं काही शिकत जातो, असं सांगणारा सिद्धार्थ आपण रोजच्या जगण्यातूनच अभिनयाचे धडे गिरवत असल्याचं स्पष्ट करतो. ‘अय्यारी’ या अ‍ॅक्शन चित्रपटानंतर बऱ्याच दिवसांनी सिद्धार्थ पुन्हा त्याच्या नेहमीच्या जॉनरकडे अर्थात प्रेमपटाकडे वळणार आहे. ‘आशिकी ३’ या चित्रपटासाठी सिद्धार्थची निवड झाली असून त्यात तो अलिया भट्टबरोबर दिसणार आहे. अलिया आणि त्याच्या प्रेमाबद्दलही सतत चर्चा होत असते, मात्र प्रत्यक्षात ते प्रेमी असोत वा नसोत, पडद्यावरची त्यांची जोडी नक्कीच लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांना आत्तापासूनच उत्सुकता असणार आहे.